पाचगणी : सध्या येथील पावसाळी पर्यटनाला बहर आला आहे. आल्हाददायक हवामान, रिमझिम पाऊस, डोंगरदऱ्यांमधून डोकावणारी धुक्याची पांढरीशुभ्र दुलई, उंचावरून कोसळणारे धबधबे आणि हिरवागार निसर्ग पर्यटकांना भुरळ घालत आहे. या मनमोहक निसर्गाचा नजराणा डोळ्यात साठवण्यासाठी आणि पावसाच्या सरींमध्ये मनसोक्त भिजण्याचा आनंद लुटण्यासाठी राज्यभरातून पर्यटकांनी पाचगणीत मोठी गर्दी केली आहे.
पाचगणीतील प्रमुख आकर्षण असलेल्या पारशी पॉइंट, भिलार वॉटर फॉल, सिडनी पॉइंट आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे पठार म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टेबल लँड या सर्वच पर्यटन स्थळांवर सध्या पर्यटकांचा ओसंडून वाहणारा उत्साह पाहायला मिळत आहे. टेबल लँडवर चालताना अंगावर येणारे पावसाचे तुषार झेलत, निसर्गाच्या कुशीत हरवून जाण्याचा एक वेगळाच आनंद पर्यटक अनुभवत आहेत. वीकेंड असो वा सामान्य दिवस, पाचगणीचा निसर्ग अनुभवण्यासाठी पर्यटकांची पावले आपोआप या थंड हवेच्या ठिकाणाकडे वळत आहेत.
पाचगणीच्या मुख्य बाजारपेठेतही सध्या मोठी आर्थिक उलाढाल
पर्यटनासोबतच पाचगणीच्या मुख्य बाजारपेठेतही सध्या मोठी आर्थिक उलाढाल पाहायला मिळत आहे. पाचगणीचे प्रसिद्ध जाम, जेली, विविध प्रकारची सिरप आणि चणे खरेदी करण्यासाठी पर्यटकांची बाजारपेठेत झुंबड उडत आहे. पर्यटन व्यवसायाला गती आल्याने स्थानिक व्यावसायिक, हॉटेल व्यावसायिक आणि इतर छोटे मोठे व्यावसायिक यांच्या चेहऱ्यावरही समाधानाचे वातावरण आहे.
पाचगणीमध्ये थंडीचा गारठा कमालीचा वाढला
रिमझिम पाऊस आणि उंचावरील वेगवान वाऱ्यामुळे पाचगणीमध्ये थंडीचा गारठा कमालीचा वाढला आहे. या गुलाबी थंडीत पर्यटकांची पावले टेबल लँड आणि विविध पॉइंट्सवरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सकडे वळत आहेत. निसर्गाचा आनंद घेत गरमागरम चणे, शेकलेली मक्याची कणसे आणि हातात वाफळलेला चहाचा कप घेऊन पर्यटक या वातावरणाचा दुप्पट आनंद घेत आहेत. निसर्गाच्या या निसर्गदत्त वातावरणात मिळणारा हा आस्वाद पर्यटकांना ताजेतवाने करत आहे.