नवी दिल्ली - कॉक्रोच जनता पार्टीच्या धडक मोर्चाच्या पार्श्वभूमीवर दिल्लीत कडेकोट बंदोबस्त लावण्यात आला आहे. जंतर मंतर परिसरात मोठ्या संख्येने युवक जमले आहेत. त्यातच युवक मोठ्या प्रमाणात संसदेच्या दिशेने जात आहेत. त्यामुळे संसद भवनाचे गेट पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत. पोलिसांनी संसद भवनाची सुरक्षा वाढवली आहे. याठिकाणी मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला असून जवान बंदुका रोखून सज्ज आहेत. त्याशिवाय पाणी फवारणारी यंत्रणाही तैनात करण्यात आली आहे.
कॉक्रोच जनता पार्टीच्या आंदोलनाला देशभरातून विद्यार्थ्यांचे समर्थन मिळत आहे. स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे विद्यार्थी आणि पालक १९ जुलैच्या संध्याकाळपासून दिल्लीतील जंतर मंतर परिसरात जमण्यास सुरुवात झाली होती. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाचा आज पहिला दिवस आहे. त्यामुळे दिल्लीतील सुरक्षा यंत्रणा अलर्टवर आहे. जंतर मंतर, संसद भवन परिसर, सेंट्रल विस्टा आणि इतर महत्त्वाच्या ठिकाणी त्रिस्तरीय सुरक्षा बनवण्यात आली आहे. ज्यात दिल्ली पोलिसांसह दंगल नियंत्रण पथक, निमलष्करी दल यांचा समावेश आहे. कुठल्याही आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी रॅपिड एक्शन फोर्सही तैनात करण्यात आली आहे.
त्यातच कॉक्रोच जनता पार्टीच्या चलो संसद या आंदोलनात सहभागी होणारे आंदोलक मोठ्या संख्येने संसद भवन मार्गापर्यंत पोहचले आहेत. यावेळी आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी बळाचा वापर केला. काही ठिकाणी लाठीचार्ज करण्यात आला. पोलिसांनी अश्रूधुराच्या नळकांड्याही फोडल्या. संसद भवनाचे मुख्य प्रवेशद्वार पोलिसांनी बंद केले. संसद भवनाकडे जाणाऱ्या सर्व मार्गावर आंदोलकांची गर्दी मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे या आंदोलनावर नियंत्रण आणण्यासाठी पोलिसांनी खबरदारी घेण्यास सुरुवात केली आहे.
धर्मेंद्र प्रधान अमित शाहांच्या भेटीला
दरम्यान, एकीकडे कॉक्रोच जनता पार्टीचे आंदोलन सुरू आहे तर दुसरीकडे केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान गृहमंत्री अमित शाह यांच्या भेटीला पोहचले आहे. नीट परीक्षेतील गोंधळ आणि इतर मुद्द्यांवरून कॉक्रोच जनता पार्टीने धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची प्रमुख मागणी केली आहे. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे यासाठी सोनम वांगचूक मागील २२ दिवसांपासून उपोषण करत आहे. त्यात आज संसद भवनाच्या दिशेने निघालेल्या धडक मोर्चामुळे दिल्लीतील वातावरण तापले आहे.