कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगरच्या दूषित पाण्याविरोधात शिवसैनिकांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

by Team Satara Today | published on : 20 July 2026


कोरेगाव : जयपूर, ता. कोरेगाव येथील शिवनेरी शुगर या खासगी साखर कारखान्याकडून दूषित सांडपाणी सोडले जात असल्‍याने रविवारी पिंपरीचे ग्रामस्‍थ आक्रमक झाले. कारखान्‍यातून निघालेले दूषित सांडपाणी बंद करावे, या मागणीसाठी शिवसैनिकांनी शोले स्‍टाईल आंदोलन केले. नागरिकांनी गावातील पाण्‍याच्‍या टाकीवरून चढून आंदोलन केल्‍याने खळबळ उडाली. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्‍तही तैनात करण्‍यात आला होता.

गेल्‍या काही दिवसांपासून पिंपरी येथील ओढे-नाल्‍यांना दूषित पाणी येत आहे. पाण्‍याचा रंग काळा असून हे रासायनिक पाणी इतर पाणीस्‍त्रोत खराब करत आहे. यामुळे पिकांनाही धोका निर्माण झाला आहे. याबाबत ग्रामस्‍थांनी शिवनेरी कारखाना प्रशासनाला वांरवार तक्रारी करूनही यावर कार्यवाही केली नाही. त्‍यामुळे रविवारी ग्रामस्‍थ आक्रमक झाले. या ग्रामस्‍थांनी कारखान्‍याविरोधात घोषणाबाजी करत हे दूषित पाणी बंद करावे, अशी मागणी केली. यानंतर काही ग्रामस्‍थांनी गावातील पाण्‍याच्‍या टाकीवर जाऊन आंदोलन केले. येथेही कारखान्‍याच्‍या विरोधात घोषणाबाजी केली. यामुळे खळबळ उडाली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिस बंदोबस्‍त ठेवण्‍यात आला होता. यानंतर पोलिस व प्रशासनाचे अधिकारी आल्‍यानंतर आक्रमक झालेल्‍या ग्रामस्‍थांना टाकीवरून खाली उतरवण्‍यात आले. ही गंभीर बाब लक्षात घेवून विस्तार अधिकारी नंदकिशोर माने आणि ग्रामपंचायत अधिकारी किरण कंठे यांनी शिवनेरी शुगर व्यवस्थापनाला अधिकृत नोटीस बजावली आहे.

नोटिशीत ग्रामपंचायतीच्या पिण्याच्या पाण्याच्या विहिरीलगत असलेल्या ओढ्यात कारखान्याचे दूषित सांडपाणी सोडून जलप्रदूषण केले आहे. त्यामुळे ग्रामस्थांच्या आरोग्यास धोका निर्माण होत असून पिण्याच्या पाण्याचा स्रोत प्रदूषित होत असल्याचे नमूद करण्यात आले आहे. ग्रामपंचायतीने कारखाना व्यवस्थापनाला तात्काळ दूषित सांडपाणी सोडणे बंद करणे, सांडपाण्यावर योग्य प्रक्रिया करूनच त्याची विल्हेवाट लावणे तसेच पिण्याच्या पाण्याच्या स्रोताचे संरक्षण सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

पिंपरी ग्रामस्थांच्या वतीने बाजार समितीचे माजी सभापती ॲड. अशोकराव पवार, वसंतराव कणसे, विष्णुपंत कणसे, विनायक जाधव, आबासाहेब पवार, सचिन पवार, जयवंत पवार, नितीन पवार, यशवंत पवार, यशवंत चव्हाण, शहाजी कणसे, शंकर साखरे, युवराज घाडगे, योगेश कदम, हेमंत पवार, राहुल फडतरे, जयंत पवार यांच्‍यासह ग्रामस्‍थांनी आंदोलन सहभाग घेतला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पाटण व कराड तालुक्यात काही भागांमध्ये शेतांमध्ये टाकत आहेत औद्योगिक घातक रासायनिक द्रव्ये; नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर विषय चर्चेत
पुढील बातमी
सीबीएसईचा दहावीच्या दुसऱ्या बोर्ड परीक्षेचा निकाल जाहीर; एकूण उत्तीर्णता प्रमाण ९६.७८ टक्क्यांवर

संबंधित बातम्या