पाटण व कराड तालुक्यात काही भागांमध्ये शेतांमध्ये टाकत आहेत औद्योगिक घातक रासायनिक द्रव्ये; नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर विषय चर्चेत

by Team Satara Today | published on : 20 July 2026


पाटण : पाटण व कराड तालुक्यातील काही भागांमध्ये औद्योगिक घातक रासायनिक द्रव्ये असल्याचा संशय असलेले टँकर अनेक वर्षांपासून शेतांमध्ये टाकले जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. कराड तालुक्यातील भोळेवाडी ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वी अशा टँकरांना गावात बंदी घालण्याचा ठराव केल्याचेही सांगितले जात आहे.

याबाबत अनेक गावातील नागरिक संभ्रमात आहेत. या प्रकाराची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ग्रामीण भागातून होत आहे. काही टँकर चालक आर्थिक मोबदल्याच्या बदल्यात शेतांमध्ये द्रव स्वरूपातील पदार्थ टाकत आहेत. हा पदार्थ शेतीसाठी उपयुक्त असल्याचे किंवा तो मळी असल्याचे सांगितले जात असले, तरी त्यातून तीव्र दुर्गंधी येत असल्याने नागरिकांमध्ये संशयाचे वातावरण आहे. पावसाळ्यात हे द्रव्य ओढे-नाल्यांद्वारे नदीपात्रात मिसळत असल्याची भीती व्यक्त केली जात आहे. याबाबत काही नागरिकांनी आवाज उठवल्यानंतर हा विषय पुन्हा चर्चेत आला आहे.

काही वर्षांपूर्वी सुमारे ३० हजार लिटर क्षमतेचा टँकर दोन हजार रुपयांपर्यंत शेतात उतरविला जात होता. सध्या मात्र अत्यल्प दरात किंवा काही ठिकाणी विनामूल्यही असे टँकर शेतांमध्ये टाकले जात असल्याचे बोलले जाते. कोकणातील औद्योगिक भागातून येणारे काही टँकर पाटण व कराड तालुक्यातील डोंगराळ भागातील शेतांमध्ये उतरविले जातात. पावसाच्या पाण्यासोबत हे द्रव्य वाहून कोयना नदीपात्रात मिसळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

कोयना नदीवरील अनेक गावांचा पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अवलंबून असल्याने या प्रकारामुळे सार्वजनिक आरोग्य धोक्यात येऊ शकते, अशी भीती नागरिक व्यक्त करत आहेत. दरम्यान, कराड तालुक्यातील भोळेवाडी ग्रामपंचायतीने दोन वर्षांपूर्वी अशा टँकरांना गावात बंदी घालण्याचा ठराव केल्याचेही सांगितले जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
त्रिपुराचे पोलीस महासंचालक अनुराग धनकरांचा कार्यालयातच आढळला मृतदेह; नेमके कारण आणि परिस्थिती शोधण्यासाठी उच्चस्तरीय चौकशी सुरू
पुढील बातमी
कोरेगाव तालुक्यातील जयपूर येथील शिवनेरी शुगरच्या दूषित पाण्याविरोधात शिवसैनिकांचे ‘शोले स्टाईल’ आंदोलन

संबंधित बातम्या