शौर्याच्या पाऊलखुणांवर शिवभक्तांची पावले! पन्हाळा ते पावनखिंड अमृत महोत्सवी मोहिमेचा थरार सुरू; राज्यभरातून 750 शिवप्रेमी युवक-युवती सहभागी

by Team Satara Today | published on : 19 July 2026


पन्हाळगड : ‘जय भवानी, जय शिवाजी’, यासह वीर शिवा काशिद, नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या नावाच्या अखंड जयघोषात आणि अंगात रोमांच सळसळणाऱया वातावरणात ऐतिहासिक पन्हाळा ते पावनखिंड या 75व्या अमृतमहोत्सवी मोहिमेस सुरुवात झाली. येथील ‘हिल रायडर्स’ संस्थेच्या वतीने या खडतर आणि ऐतिहासिक मोहिमेचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, संस्थेचे हे 41 वे वर्ष असून, आजच्या या 75व्या मोहिमेत राज्यभरातून तब्बल 750 शिवप्रेमी युवक-युवती मोठय़ा उत्साहाने सहभागी झाले आहेत.

मोहिमेची सुरुवात ऐतिहासिक पन्हाळगड येथील वीर शिवा काशिद आणि नरवीर बाजीप्रभू देशपांडे यांच्या भव्य पुतळ्याला अभिवादन करून झाली. ध्येयमंत्र आणि मर्दानी खेळांच्या थरारक प्रात्यक्षिकांनी चैतन्य निर्माण झाले होते. छोटा शिलेदार रायभान सूरज ढोली याने अत्यंत धीरोदात्त आवाजात ध्येयमंत्री आणि प्रेरणा मंत्राचे पठण केले.

श्रीगोंदा येथून आलेल्या तरुण शिवभक्तांनी छत्रपती शिवाजी महाराजांची पारंपरिक ललकारी म्हणजेच ‘राजांची गारद’ दिल्यानंतर शिवरायांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला. ‘शंभूराजे मर्दानी खेळ विकास मंच’च्या धारकऱयांनी सादर केलेली लाठी-काठी, तलवारबाजी आणि दांडपट्टय़ाची थरारक प्रात्यक्षिके उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली.

हा केवळ ट्रेक नाही, तर पूर्वजांच्या रक्ताने पावन झालेल्या मातीची कृतज्ञता 

इतिहास अभ्यासक व लेखक राहुल नलवडे (रायबा) यांनी आपल्या अमोघ वाणीतून पन्हाळगड ते पावनखिंड या रणसंग्रामाचा संपूर्ण शौर्यशाली इतिहास जिवंत केला. त्यांच्या व्याख्यानाने मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येक शिलेदाराच्या अंगात एक नवी ऊर्जा आणि वीरश्री संचारली.

सह्याद्रीच्या दऱयाखोऱयांतून चिखल-काजळी आणि पावसाची तमा न बाळगता सलग 41 वर्षे अशा खडतर ऐतिहासिक वाटेवर मोहिमांचे आयोजन करणे ही सोपी गोष्ट नाही. ‘हिल रायडर्स’च्या शिलेदारांनी संस्थापक प्रमोद पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे शिवधनुष्य लीलया पेलल्याने सर्वच स्तरांतून कौतुक होत आहे. 750 शिवप्रेमींचा हा जथा आता इतिहास अनुभवण्यासाठी, नरवीर बाजीप्रभू आणि फुलाजीप्रभू यांच्या बलिदानाने पावन झालेल्या घोडखिंडीच्या (पावनखिंड) दिशेने मार्गस्थ झाला आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
२०२४ साठीच्या ७२ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांची घोषणा; 'मुक्काम पोस्ट बोंबिलवाडी' सर्वोत्कृष्ट मराठी चित्रपट, 'श्रीकांत' सर्वोत्कृष्ट हिंदी चित्रपट
पुढील बातमी
संगमेश्वरच्या 'बामणोली'च्या नावाखाली जावलीत निधी खर्च; सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कामकाजावर गंभीर प्रश्नचिन्ह

संबंधित बातम्या