पुणे : कोकण, घाटमाथा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाच्या हलक्या ते जोरदार सरींनी हजेरी लावली आहे. मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात जोरदार वारा, विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्याने ‘येलो अलर्ट’ देण्यात आला आहे. उर्वरित मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांसह हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.
झारखंड आणि पश्चिम बंगालमधील कमी दाबाचे क्षेत्र निवळले असून, या भागात समुद्र सपाटीपासून ४.५ किलोमीटर उंचीपर्यंत चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे. मॉन्सूनचा आस असलेला कमी दाबाचा पट्टा पंजाबच्या अमृतसरपासून कर्नाल, हरदोई, रांची, दिघा ते वायव्य बंगालच्या उपसागरापर्यंत सक्रिय आहे.
मध्य प्रदेश परिसरावर समुद्र सपाटीपासून ३.१ किलोमीटर उंचीवर आणि दक्षिण ओडिशा परिसरावर ५.८ किलोमीटर उंचीवर चक्राकार वारे वाहत आहेत. यातच मन्नारचे आखात आणि दक्षिण तमिळनाडू परिसरावर, तसेच उत्तर केरळ परिसरावर समुद्रसपाटीपासून ५.८ ते ७.६ किलोमीटर उंचीदरम्यान चक्राकार वाऱ्यांची स्थिती आहे.
मुंबई शहर आणि उपनगरांत शनिवारी दुपारनंतर ठिकठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या. सकाळपासून मुंबईकरांना प्रचंड उकाड्याचा सामना करावा लागत होता; मात्र दुपारनंतर अचानक आलेल्या पावसामुळे वातावरणात काहीसा गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे.