नागठाणे : स्वतःच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना एका शेतकऱ्याने सामाजिक संवेदनशीलतेचे दर्शन घडवत दिवंगत पत्रकार कन्येच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. या कृतीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
पाडळी (ता. सातारा) येथील ऋषिकेश ढाणे यांचा प्रगतशील शेतकरी म्हणून राज्यभर लौकिक आहे. राज्य शासनासह विविध नामांकित पुरस्कारांनी त्यांचा गौरव झाला आहे. अलीकडेच त्यांच्या मातोश्रींचे दुर्दैवी अपघातात निधन झाले. त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना त्यांनी परिसरातील दिवंगत पत्रकार नितीन साळुंखे यांच्या कन्येच्या शिक्षणासाठी मदतीचा हात पुढे केला.
(कै.) साळुंखे यांची कन्या सानिका ही सध्या उच्च शिक्षण घेत आहे. याबाबत मराठी पत्रकार संघाचे जिल्हा उपाध्यक्ष दत्ता घाडगे यांनी श्री. ढाणे यांच्याशी संपर्क साधून (कै.) साळुंखे यांच्या कुटुंबाच्या परिस्थितीची माहिती दिली. समाजकार्यात नेहमीच अग्रेसर असलेल्या श्री. ढाणे यांनी तत्काळ सानिकाच्या पुढील शिक्षणासाठी धनादेशाच्या स्वरूपात आर्थिक मदत दिली.
या वेळी नागठाणे विभाग पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रमोद पंचपोर, उपाध्यक्ष विजय घोरपडे, विजय अलाटे, विकास जाधव, प्रताप भोसले, दत्ता घाडगे, किरण पवार, संदीप जाधव, शरद पवार आदी पत्रकार बांधव उपस्थित होते. उपस्थितांनी श्री. ढाणे यांच्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले.