दिल्ली : गेल्या २१ दिवसांपासून उपोषणाला बसलेले प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या तब्येतीबाबत सफदरजंग रुग्णालयाच्या मेडिकल सुपरिटेंडेंट डॉ. चारू बांबा यांनी आज (दि. १९) मोठी अपडेट दिली. डॉ. बांबा यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोनम वांगचुक सध्या पूर्णपणे शुद्धीवर आहेत.
तब्बल २१ दिवसांचे उपोषण, शरीरात पाण्याची कमतरता
डॉक्टरांनी सांगितले की, वांगचुक यांचा रक्त दाब (BP), पल्स रेट (हृदयाचे ठोके) आणि ऑक्सिजनची पातळी सध्या सामान्य आहे. मात्र, सततचे उपोषण आणि 'डिहायड्रेशन'मुळे (शरीरातील पाण्याची कमतरता) त्यांच्या रक्ताच्या चाचण्या आणि इलेक्ट्रोलाइट पातळीमध्ये काही प्रमाणात घट झाली आहे. यासाठी रुग्णालयाकडून त्यांना आवश्यक ते वैद्यकीय उपचार दिले जात आहेत. त्यांची प्रकृती स्थिर ठेवण्यासाठी त्यांना २४ तास डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले असून, कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय पथक सज्ज असल्याचे रुग्णालय प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
औषध घेण्यास नकार, समुपदेशन सुरु
सोनम वांगचुक यांना शनिवार, १८ जुलै २०२६ रोजी सकाळी व्हीएमएमसी आणि सफदरजंग रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते २० दिवसांपासून बेमुदत उपोषण करत असल्याने त्यांना अशक्तपणा आहे. मात्र बेशुद्धी नाहीत. रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी ते शुद्धीवर होते आणि त्यांची नाडी, रक्तदाब व ऑक्सिजनची पातळी स्थिर होती. शिरेवाटे द्रवपदार्थ देण्याचा सल्ला दिला गेला असला तरी, रुग्णाने सर्व प्रकारचे द्रवपदार्थ, तोंडावाटे घ्यावयाचे इहायड्रेशन द्रव किंवा इतर कोणतेही औषध घेण्यास नकार दिला आहे. त्यांच्यावर सतत देखरेख ठेवली जात आहे आणि उपचारांसाठी समुपदेशन केले जात आहे, असेही रुग्णालयाच्या प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
सोनम वांगचुक हे NEET-UG परीक्षेत झालेला कथित घोटाळा आणि पेपर लीक प्रकरणावरून केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहेत. ते 'कॉकरोच जनता पार्टी' (CJP) च्या बॅनरखाली २८ जूनपासून दिल्लीच्या जंतर-मंतरवर बेमुदत उपोषणाला बसले होते. १८ जुलै रोजी (शनिवारी) सकाळी दिल्ली हायकोर्टाचे निर्देश आणि बिघडत्या तब्येतीचा हवाला देत दिल्ली पोलिसांनी त्यांना जबरदस्तीने सफदरजंग रुग्णालयात हलवले. दरम्यान, रुग्णालय प्रशासनाच्या दाव्याच्या उलट, वांगचुक यांच्या कुटुंबीयांनी आणि सहकाऱ्यांनी त्यांच्या संमतीशिवाय उपचार केले जात असल्याचा आरोप करत तीव्र आक्षेप घेतला आहे.
सोनम वांगचुक यांच्या पत्नी हायकोर्टात; तातडीच्या सुनावणीची मागणी
दुसरीकडे, सोनम वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली जे. आंग्मो यांनी दिल्ली हायकोर्टात धाव घेतली आहे. वांगचुक यांना सफदरजंग रुग्णालयातून हलवून एखाद्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्याची परवानगी मिळावी, अशी मागणी त्यांनी याचिकेद्वारे केली असून, यावर रविवारीच तातडीने सुनावणी घेण्याची विनंती त्यांनी केली आहे."आमचा सफदरजंग रुग्णालयावर अजिबात विश्वास राहिलेला नाही. वांगचुक यांची तब्येत अधिक बिघडण्यापूर्वी आम्हाला त्यांना तिथून बाहेर काढून आमच्या पसंतीच्या खाजगी रुग्णालयात दाखल करायचे आहे," असे आंग्मो यांनी म्हटले आहे.