फलटण : श्रीरामनगरीने शनिवारी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याला भक्तिमय निरोप दिला. लाखो वारकऱ्यांच्या सहवासात, टाळ-मृदुंगाच्या अखंड गजरात, ‘माऊली... माऊली...’च्या जयघोषात आणि फुलांच्या वर्षावात माऊलींचा रथ आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झाला.
धार्मिक परंपरेने समृद्ध असलेल्या श्रीरामनगरीतील एक दिवसाचा मुक्काम संपवून शनिवारी सकाळी साडेसहा वाजता पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी बरडकडे रवाना झाला. शुक्रवारी सायंकाळी पालखीचे आगमन होताच नगरपालिकेच्यावतीने नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर व मान्यवरांनी माऊलींचे स्वागत केले. पालखी मार्गावर हजारो भाविक दर्शनासाठी उभे होते. हरिनामाच्या गजरात पालखी पालखीतळावर दाखल होताच संपूर्ण फलटणनगरी भक्तिरसात न्हाऊन निघाली. सायंकाळी झालेल्या धार्मिक कार्यक्रमांत मोठ्या संख्येने वारकरी व भाविक सहभागी झाले.
लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी भक्तिभावाने पंढरीच्या दिशेने चालत होते. ‘हुरहुर वाटे जीवास भारी, निघता माऊली सोडुनी आम्हासी...’ या भावनेने भारावलेले फलटणकर अश्रुपूर्ण नजरेने माऊलींच्या रथाकडे पाहत होते. माऊलींचा रथ गिरवी चौक, श्री ज्ञानेश्वर मंदिर, आंबेडकर चौक आणि क्रांतिसिंह नाना पाटील चौक मार्गे बरडकडे रवाना झाला. शहरातील नागरिकांनी पालखीवर पुष्पवृष्टी करून माऊलींना निरोप दिला.