सातारा : वाई तालुक्यातील खावली जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील शिक्षिकेस मारहाण करणारे प्रभारी मुख्याध्यापक धर्मेंद्र विष्णू दीक्षित यांच्यावर सातारा जिल्हा परिषद प्रशासनाने तत्काळ निलंबनाची कारवाई केली. तसेच या निलंबन कालावधीत त्यांचे मुख्यालय हे कराड पंचायत समिती राहणार आहे. तर शिक्षण समिती सभापती तेजस्वीनी कदम यांनी महिला कर्मचाऱ्यांवरील अन्याय सहन केले जाणार नाहीत, असा इशारा दिला.
खावली शाळेतील महिला शिक्षिकेस मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित यांनी मारहाण केली होती. याप्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झालेला. या प्रकरणाची जिल्हा परिषद अध्यक्ष प्रिया शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, शिक्षण समिती सभापती तेजस्वीनी कदम यांनी तातडीने दखल घेतली. तसेच त्यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांच्याकडे संबंधित मुख्याध्यापकावर कारवाईबाबत चर्चा केली.
यानंतर प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी अनिस नायकवडी यांनी वाई गटशिक्षणाधिकारी यांना तत्काळ प्रस्ताव सादर करण्याचे आदेश दिले. अहवाल प्राप्त झाल्यानंतर नियमानुसार मुख्याध्यापक धर्मेंद्र दीक्षित यांना निलंबित केल्याचा आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन यांनी काढला आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा परिषदेतील महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांवरील अन्याय तसेच कोणत्याही प्रकारचा शिस्तभंग खपवून घेतला जाणार नाही. कायदा आणि नियम सर्वांसाठी समान आहेत. महिला कर्मचाऱ्यांवरील अन्यायाबाबत तडजोड केली जाणार नाही, संबंधितांवर तत्काळ कठोर कारवाई करु, असा इशारा जिल्हा परिषद प्रशासनाने दिला आहे.