राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता; एसटीने अखेर दरवाढ केली,आज मध्यरात्रीपासून लागू

by Team Satara Today | published on : 17 July 2026


मुंबई :  राज्य परिवहन प्राधिकरणाने महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (ST) १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. या भाडेवाढीमुळे यापूर्वी केलेली साध्या बसेस ची १० टक्के हंगामी भाडेवाढ रद्द होईल, अशी माहिती देण्यात आली आहे. 

एसटी महामंडळाच्या आर्थिक शाश्वततेसह प्रवाशांना सुरक्षित, दर्जेदार आणि अखंड सेवा देण्यासाठी ही भाडेवाढ अपरिहार्य होती. वाढत्या खर्चाचा भार सहन करत राज्यातील लाखो प्रवाशांना सेवा देणाऱ्या एसटीच्या दैनंदिन कार्यावर आर्थिक ताण निर्माण होत असल्याने, सेवा सुरळीत ठेवण्यासाठी भाडेवाढीचा निर्णय आवश्यक ठरला आहे, असे म्हटले जात आहे. 

सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला 

आखाती देशांतील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग, टायर आणि देखभाल खर्चात झालेली लक्षणीय वाढ यांचा सर्वंकष विचार करून हा निर्णय घेण्यात आला आहे, असे समजते.  ही भाडेवाढ एसटीची सेवा अधिक सक्षम आणि टिकाऊ बनविण्यासाठी करण्यात आली असून, प्रवाशांच्या सुरक्षित व विश्वासार्ह प्रवासासाठी आवश्यक सुविधा आणि गुणवत्तापूर्ण सेवा कायम राखण्यास त्यामुळे मदत होणार आहे, असे सांगण्यात आले आहे.

प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर दाखविलेला विश्वास कायम ठेवावा

राज्य परिवहन प्राधिकरणाने एसटी महामंडळाच्या १३.५६ टक्के भाडेवाढीच्या प्रस्तावास मान्यता दिली आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील युद्धजन्य परिस्थितीमुळे डिझेलच्या दरात झालेली वाढ, एसटी कर्मचाऱ्यांच्या विविध भत्त्यांमध्ये करण्यात आलेली वाढ तसेच वाहनांचे सुटे भाग आणि टायर यांच्या किमतीत झालेली वाढ यामुळे ही भाडेवाढ अपरिहार्य ठरली आहे. ही भाडेवाढ करताना प्रवाशांवर कमीत कमी आर्थिक भार पडेल, याची काळजी घेण्यात आली आहे. राज्यातील सर्वसामान्य जनतेला सुरक्षित, दर्जेदार आणि अखंडित सेवा देण्यासाठी तसेच एसटी महामंडळ आर्थिकदृष्ट्या अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने हा निर्णय महत्त्वाचा आहे. प्रवाशांनी नेहमीप्रमाणे एसटीवर दाखविलेला विश्वास कायम ठेवावा, ही अपेक्षा आहे, असे मंत्री प्रताप सरनाईक यांनी म्हटले आहे.

दरम्यान,  राज्यातील ३१ पैकी २२ विभागांना आपला खर्च भागवण्याइतपतही महसूल मिळवता आलेला नाही, असे म्हटले जात आहे. वाढत्या डिझेल किंमतीमुळे एसटी महामंडळाने १० टक्के हंगामी भाडेवाढ ३१ जुलैपर्यंत वाढवली होती. तत्पूर्वी, राज्यात १५ एप्रिल ते १५ जून या कालावधीत १० टक्के हंगामी भाडेवाढ लागू करण्यात आली. त्याला एक महिन्याचीमुदतवाढ देण्यात आली होती. 


बसेसचा मार्ग जुने दर नवीन दर 

मुंबई–सातारा ४९८         ५१५

मुंबई–कोल्हापूर ७३०         ७५५

मुंबई–नाशिक ३५५           ३७०

मुंबई–धुळे  ६६४         ६८५

मुंबई–चिपळूण ४९८        ५१५

मुंबई–सोलापूर ७७५       ८००

पुणे–कोल्हापूर ४२१ ४३५

पुणे–अहिल्यानगर २३३ २४०

पुणे– छत्रपती संभाजीनगर ४५४ ४७०

पुणे–सोलापूर ४६५ ४८०

नाशिक–पुणे ४१० ४२५



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
श्री ज्ञानेश्वर पालखी सोहळ्यात तरुणाईचा उत्स्फूर्त सहभाग; तरडगाव ते फलटण दिंडीत युवक-युवतींची मोठी उपस्थिती
पुढील बातमी
वाई तालुक्यातील खावली शाळेतील शिक्षिकेस मारहाण करणारा मुख्याध्यापक निलंबित, सातारा जिल्हा परिषद प्रशासनाची तत्काळ कारवाई

संबंधित बातम्या