सातारा : आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सहायता निधी आणि धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या 'चरणसेवा' उपक्रमाला वारकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या विशेष आरोग्य मोहिमेअंतर्गत विविध ठिकाणी तब्बल ५ हजार ७४४ वारकऱ्यांनी मोफत वैद्यकीय तपासणी, उपचार आणि चरणसेवेचा लाभ घेतला.
या महाआरोग्य शिबिरामध्ये जिल्ह्यातील विविध वैद्यकीय महाविद्यालये आणि सामाजिक संस्थांनी सक्रिय सहभाग नोंदवून वारकऱ्यांची मनोभावे सेवा केली. यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्र, तरडगाव: येथे सावकार होमिओपॅथिक महाविद्यालयाच्या वतीने ३४० वारकऱ्यांना चरणसेवा देण्यात आली. जर्मन टेन्ट, वारवंट या ठिकाणी सर्वात मोठा मदत कक्ष उभारण्यात आला होता. यामध्ये सावकार आयुर्वेदिक महाविद्यालयामार्फत ८३० वारकऱ्यांना, तर छत्रपती संभाजी महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, सातारा यांच्या वतीने ६०० वारकऱ्यांना चरणसेवा आणि १८४ वारकऱ्यांवर ड्रेसिंगचे उपचार करण्यात आले. तसेच महालक्ष्मी फिजिओथेरपी महाविद्यालय (रायगाव) तर्फे १,२३० आणि कृष्णा कॉलेज ऑफ फिजिओथेरपीतर्फे ९६० वारकऱ्यांना फिजिओथेरपी व चरणसेवेचा लाभ देण्यात आला.
जिल्हा परिषद शाळा, तरडगाव येथे आरोग्य भारती (सातारा) आणि आरोग्य भारती (पुसद) यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत बाह्यरुग्ण विभाग (OPD) चालवला गेला. यामध्ये ७४० रुग्णांची मोफत तपासणी व औषधोपचार करण्यात आले. सावता माळी मंदिर, तरडगाव: अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्यावतीने आयोजित कक्षात ५४० जणांना चरणसेवा देण्यात आली, तर ३२० वारकऱ्यांवर मोफत बाह्यरुग्ण विभागाद्वारे उपचार करण्यात आले.
वारीच्या वाटेवर चालून थकलेल्या आणि पायाला दुखापत झालेल्या हजारो वारकऱ्यांना या उपक्रमामुळे मोठा दिलासा मिळाला असून, मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाच्या या मानवतावादी कार्याचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.