फलटण : संत परंपरेचा अखंड वारसा जपत लाखो वारकऱ्यांच्या उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे फलटण नगरीत अभूतपूर्व आणि जल्लोषपूर्ण स्वागत करण्यात आले. “विठ्ठल विठ्ठल” आणि “माऊली माऊली”च्या अखंड जयघोषात संपूर्ण शहर दुमदुमून गेले होते. मुसळधार पावसातही वारकऱ्यांचा उत्साह कायम होता.
पालखीचे आगमन होताच वारकऱ्यांच्या भावनांना उधाण आले. टाळ मृदंगाचा गजर, टाळ-मृदंगाच्या तालावर नाचणारे वारकरी, भगव्या पताकांचा फडकणारा सागर आणि अभंगांच्या स्वरांनी वातावरण पूर्णतः भक्तिमय झाले होते. रस्त्यांच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनीही फुलांची उधळण करत पालखीचे मनोभावे स्वागत केले.
फलटण शहरात विविध सामाजिक संस्था, मंडळे आणि नागरिकांच्या वतीने वारकऱ्यांसाठी पिण्याचे पाणी, अल्पोपहार व वैद्यकीय सेवांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी उभारलेल्या स्वागत कमानी, रांगोळ्या आणि सजावट यामुळे शहराचा साज अधिक खुलून दिसत होता.
पालखीच्या स्वागतानंतर शहरात भक्तिमय वातावरणात दिंड्यांचा मुक्काम झाला. वारकऱ्यांनी हरिनामाच्या गजरात, अभंग-भजनांच्या माध्यमातून भक्तीचा अनोखा सोहळा रंगवला.
श्री संत ज्ञानेश्वर पालखी सोहळा हा केवळ धार्मिक परंपरा नसून समाजातील ऐक्य, श्रद्धा आणि सेवाभाव यांचे प्रतीक असल्याचे चित्र फलटण नगरीत पाहायला मिळाले.