दिल्ली : पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारित असलेल्या मध्य प्रदेशमधील शिवपुरी जिल्ह्यातील ऐतिहासिक नरवर किल्ल्यात एक धक्कादायक घटना घडली आहे. या किल्ल्यावर असलेली मराठा साम्राज्यातील शिंदेकालीन ऐतिहासिक तोफ चोरट्यांनी लंपास केली आहे. शेकडो वर्षे जुन्या असलेल्या या तोफेचं वजन सुमारे ३ हजार किलो एवढं होतं. एवढी ऐतिहासिक आणि अवजड वस्तू चोरीस गेल्याने पुरातत्त्व विभागाचा कारभार आणि किल्ल्यावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. आता पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपासाला सुरुवात केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ही घटना १४ आणि १५ जुलैदरम्यान, रात्री घडली होती. चोरट्यांनी किल्याच्या कचेरी महालात ठेवलेल्या १४ ऐतिहासिक तोफांपैकी एका तोफेला आपलं लक्ष्य केलं. चोरट्यांनी ही तोफ उंचावरून खाली ढकलली. नंतर ट्रक किंवा ट्रॅक्टरसारख्या मालवाहू वाहनात लादून नेली. धक्कादायक बाब म्हणजे एवढी मोठी वस्तू चोरीस गेली तरी पुरातत्त्व विभागाला त्याची कुणकुणही लागली नाही.
दुसऱ्या दिवशी किल्ल्याची देखभाल करणारा चौकीदार रमेश नेहमीप्रमाणे निरीक्षण करण्यासाठी किल्ल्यातील कचेरी महाला येथे आला तेव्हा तिथे ठेवलेल्या १४ तोफांपैकी एक तोफ गायब असल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्यानंतर रमेश याने याची माहिती नरवर पोलिसांना दिली. तक्रार मिळाल्यानंतर पोलिसांनी चोरीचा गुन्हा नोंद करून पुढील तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावर वाहनांच्या टायरच्या खुणा सापडल्या आहेत. त्यामुळे चोरट्यांनी ही तोफ एखाद्या मोठ्या वाहनात भरून नेली असावी, असा अंदाज वर्तवला जात आहे.
आता पोलिसांकडून या प्रकरणी तपासाला सुरुवात झाली असून, आजूबाजूला असलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमधील फुटेज आणि इतर तांत्रिक पुराव्यांच्या आधारे पोलिसांकडून आरोपींचा शोध घेतला जात आहे. काही दिवसांपूर्वी गुप्तधनाच्या हव्यासापोटी काही लोकांनी किल्ल्यात खोदकाम केल्याही घटनाही घडली होती. त्यामुळे या किल्ल्याच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत.