सातारा : राजपथ परिसरातील 'डंका' फास्ट फूड जॉईंट येथे १६ जुलै रोजी घडलेल्या घटनेबाबत काही प्रसारमाध्यमांतून चुकीचे आणि दिशाभूल करणारे वृत्त प्रसारित होत असून, नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण साताराचे निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी दिले आहे.
निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील हे १६ जुलै रोजी रात्री नऊ वाजताच्या सुमारास त्यांचे मित्र अमर मोरे यांच्यासोबत राजपथ येथील नगरपालिका इमारतीसमोरील 'डंका' फास्ट फूड जॉईंट येथे अल्पोपहारासाठी गेले होते. त्यावेळी तेथे दुकानातील कर्मचारी आणि एका मद्यधुंद व्यक्तीमध्ये गंभीर वाद व मारामारी सुरू असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. घटनास्थळी लोकांचा मोठा जमाव उपस्थित होता, मात्र सर्वजण केवळ बघ्याची भूमिका घेत होते. सार्वजनिक ठिकाणी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये आणि सुरू असलेला हिंसक प्रकार थांबावा, याच उद्देशाने श्री. पाटील यांनी स्वतः पुढे होऊन मध्यस्थी करत वाद मिटवण्याचा प्रयत्न केला.
हा वाद सोडवत असताना संबंधित मद्यधुंद व्यक्तीने व त्याच्या सहकाऱ्याने निवासी उपजिल्हाधिकाऱ्यांशी हुज्जत घालून त्यांच्यासोबत झटापट करण्याचा प्रयत्न केला. या प्रकारादरम्यान श्री. पाटील यांनी स्वतः तात्काळ सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक म्हेत्रे यांना दूरध्वनीवरून घटनेची माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांनी त्वरित घटनास्थळी धाव घेत संबंधित संशयितांना ताब्यात घेतले, ज्यामुळे पुढील मोठा हिंसक प्रकार टळला. या घटनेत निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना कोणतीही गंभीर मारहाण झालेली नसून, केवळ वाद मिटवताना झालेली ती एक सामान्य झटापट होती. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार नोंदवण्यात आली असून पोलिसांकडून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.