सोनम वांगचुक यांना केंद्रीय शिक्षण मंत्री बनवा - अरविंद केजरीवाल, केजरीवाल, राकेश टिकैत यांनी घेतली वांगचुक यांची भेट

by Team Satara Today | published on : 16 July 2026


नवी दिल्ली : केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीकडून (CJP) दिल्लीतील जंतर-मंतरवर आंदोलन सुरूच आहे. आंदोलनाचा आजचा 27 वा दिवस आहे. या आंदोलनाचा एक भाग म्हणून पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुंग यांनीही याठिकाणी उपोषण सुरु केलं आहे. त्यांच्या उपोषणाचा आजचा 19 वा दिवस आहे. उपोषणामुळं सोनम वांगचुंग यांची तब्येत खालावली आहे.

विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा : दरम्यान, गुरूवारी (16 जुलै) भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी जंतर-मंतरवर सोनम वांगचुक यांची भेट घेतली. त्यांनी विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा व्यक्त केला. आंदोलकांना संबोधित करताना राकेश टिकैत म्हणाले की, "सध्याचे सरकार हुकूमशाही असून आंदोलकांनी मरावे, अशी त्यांची इच्छा आहे. 19 दिवसांपासून उपोषणावर असलेल्या कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबद्दलही मोठी चिंता व्यक्त केली जात आहे. जर सरकारनं कॉकरोच जनता पार्टीच्या मागण्या मान्य केल्या नाहीत, तर समाजसेवकांनी पुढं येऊन त्यांना पाठिंबा दिला पाहिजे."

लवकरच विजय मिळेल : पुढं राकेश टिकैत यांनी सांगितलं की, "ज्याप्रमाणे सोनम वांगचुक यांनी महिनाभर चाललेले पूर्णपणे शांततापूर्ण पर्यावरण आंदोलन केलं, त्याचप्रमाणे कॉकरोच जनता पार्टीही असेच एक शांततापूर्ण आंदोलन करत आहे. मात्र, सध्याचे हुकूमशाही आणि उद्योगपती सरकार त्यांच्या समस्यांकडे दुर्लक्ष करत आहे. येथील विद्यार्थी चळवळ केवळ वैचारिक क्रांतीतूनच पुढं जाऊ शकते. तसंच जगातील सर्वात मोठी क्रांती ही वैचारिक क्रांतीच असते. आता वैचारिक क्रांती अवतरली आहे आणि लवकरच विजय मिळेल अशी आशा आहे," अंसही राकेश टिकैत म्हणाले.

 सोनम वांगचुक यांना केंद्रीय शिक्षण मंत्री बनवा - अरविंद केजरीवाल

आम आदमी पार्टीचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनीही आज सोनम वांगचुक यांची भेट घेतली. यावेळी शिक्षण व्यवस्था, पेपरफुटी आणि स्पर्धा परीक्षांमधील कथित अनियमिततेवरून त्यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला. तसंच केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना त्यांच्या पदावरून हटवून शिक्षण सुधारणांसाठी काम करणाऱ्या सोनम वांगचुक यांची देशाच्या शिक्षण मंत्रीपदी नियुक्ती करण्याची मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली. याचबरोबर, सध्याच्या शिक्षण व्यवस्थेत व्यापक आणि क्रांतिकारी बदलांची गरज असल्याचं त्यांनी सांगितलं. पुढं ते म्हणाले की, "सोनम वांगचुक गेल्या 19 दिवसांपासून स्वतःसाठी नव्हे, तर देशभरातील लाखो विद्यार्थी आणि तरुणांच्या भविष्यासाठी उपोषणाला बसले आहेत. शिक्षण व्यवस्थेत सुधारणांच्या मागणीसाठी आंदोलन करणारे देशाच्या भविष्यासाठी लढत आहेत आणि त्यांचा आदर केला पाहिजे."

काँग्रेसने सोनम वांगचुक यांना आवाहन

दुसरीकडे, काँग्रेस पक्षानं गुरुवारी सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ भूमिका घेतली असून, त्यांची ढासळती प्रकृती पाहता त्यांना उपोषण मागे घेण्याचं आवाहन केलं आहे. काँग्रेसचे संघटन महासचिव के. सी. वेणुगोपाल म्हणाले की, "सोनम वांगचुक केंद्रीय शिक्षणमंत्र्यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी गेल्या 19 दिवसांपासून उपोषणावर आहेत. काँग्रेस गेल्या दीड महिन्यापासून ही मागणी करत आहे. आम्ही वांगचुक यांचं दुःख आणि संताप समजू शकतो, विशेषतः मोदी सरकारच्या उत्तरदायित्वाच्या अभावामुळं आणि त्यातही परीक्षा पद्धतीच्या ढासळण्यामुळं." तसंच के. सी. वेणुगोपाल यांनी इन्स्टाग्रामवर लिहिलं की, "त्यांची प्रकृती पाहता, आम्ही वांगचुक यांना उपोषण संपवण्याचं आवाहन करतो. त्यांच्या चिंता आमच्या आणि इतर विरोधी पक्षांच्याही आहेत." दरम्यान, काँग्रेस या मुद्द्यावरून भाजपा सरकारवर हल्लाबोल करत आहे आणि धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुंबईत मिरा रोडच्या 'जेपी नॉर्थ' परिसरात 13 व्या मजल्यावरील बांधकाम क्रेन कोसळून भीषण दुर्घटना; एकाचा मृत्यू झाला, तीन जण जखमी
पुढील बातमी
निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांना मारहाण; संशयित पोलिसांच्या ताब्यात

संबंधित बातम्या