सातारा : वाई नगरपालिकेचे नगराध्यक्ष अनिल सावंत यांनी अधिकाराचा गैरवापर करत निविदा प्रक्रियेमध्ये हस्तक्षेप करुन पात्र नसलेल्या कंपनीला ठेका दिल्याचे माहिती अधिकारात मिळालेल्या कागदपत्रावरुन स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नगराध्यक्ष अनिल सावंत यांना अपात्र करण्यात यावे, अशी मागणी सामाजिक, माहिती अधिकार कार्यकर्ते सुशांत मोरे यांनी जिल्हाधिकार्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे, अनिल लक्ष्मण सावंत हे 2025 मध्ये वाई नगरपरिषदेच्या झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीमध्ये थेट नगराध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत. दि. 2 जुलै रोजी पार पडलेल्या सर्व साधारण सभेपुढील विषय क्रमांक एक इकॉनॉमिक टाइम्स या वृत्तपत्रांमध्ये दि. 24 एप्रिल 2026 रोजी प्रसिध्द करण्यात आलेली व वाई नगरपरिषदेची जुना साठलेला कचरा बायोमायनिंग शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावणे या कामाची निविदा प्राप्त झालेल्या निविदेचा लखोटा क्रमांक दोन उघडून निविदा मंजुरीसाठी स्थायी समितीकडे सादर करावे त्यासाठी सभा या ठरावाद्वारे मंजूर देण्यात आली होती.
माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या कागदपत्रावरून ठेकेदाराकडून प्राप्त झालेल्या निविदांनुसार कायद्याने फक्त दोनच निविदा पात्र असताना अनाधिकृतपणे तिसरी निविदासुध्दा पात्र केली आहे. यामध्ये स्थायी समिती सभापती म्हणजेच विद्यमान नगराध्यक्ष सावंत यांचा प्रत्यक्ष सहभाग आहे. वाई नगरपरिषदेच्या वाई यांनी त्यांच्या स्थायी समिती विषय क्रमांक एकच्या अनुषंगाने ठराव आधारे वाई नगरपरिषदेच्या जुन्या साठलेल्या कचरा बायोमैनिक शास्त्रीय पध्दतीने विल्हेवाट लावणे अंदाजपत्रकीय रक्कम पाच कोटी होती. यासाठी मे नेकॉफ ऑफ मुंबई, भाग्यदीप वेस्ट मॅनेजमेंट प्रायव्हेट लिमिटेड, सृष्टी कन्स्ट्रक्शन अँड एन्व्हायरमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या निविदा धारकांची निविदा प्राप्त झालेली दाखवली आहे. वरील तिन्हीपैकी सृष्टी कन्स्ट्रक्शन अँड इन्व्हेस्टमेंट फॅसिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या फर्ममध्ये नगराध्यक्ष अनिल सावंत यांचा अप्रत्यक्षरीत्या संबंध असल्याने दोनच निविदा पात्र असताना कागदांमध्ये हेराफेरी करून तिसर्या कंपनीच्या तुलनात्मक तक्तात दाखवून विषय व ठराव पारित केलेले आहेत. त्यामुळे वाईचे नगराध्यक्ष अनिल लक्ष्मण सावंत यांना तसेच या ठरावासाठी सूचक म्हणून नगरसेविका सौ. केतकी मोरे पाटणे, नगरसेविका नूतन मालुसरे आणि अनुमोदक नगरसेवक विजय ढेकाने यांनी उपस्थित राहून सही केली आहे. त्यामुळे यांनाही अपात्र करण्यात यावे, अशी मागणी मोरे यांनी केली आहे.