सातारा : मायणी गटाचे जिल्हा परिषद सदस्य सुरज शिवाजीराव पाटील यांच्या कुणबी जात प्रमाणपत्राबाबत दाखल करण्यात आलेली तक्रार जात प्रमाणपत्र पडताळणी समितीने फेटाळून लावत त्यांचा जातदावा वैध ठरविला आहे. या निर्णयाची माहिती माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर तसेच मायणीचे जिल्हा परिषद सदस्य सुरज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रेणुताई येळगावकर उपस्थित होत्या.
पत्रकार परिषदेत सुरज पाटील यांनी सांगितले की, महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग (जात प्रमाणपत्र पडताळणी) नियम, 2012 मधील नियम 17(6) अन्वये त्यांचा ‘कुणबी’ जातीचा दावा समितीने मान्य केला आहे. उपविभागीय अधिकारी, माण-खटाव, जिल्हा सातारा यांनी 22 नोव्हेंबर 2025 रोजी निर्गमित केलेले कुणबी जातीचे प्रमाणपत्र वैध ठरविण्यात आले असून, विहित नमुना क्रमांक 24 नुसार जात वैधता प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले आहे.
समितीने उपलब्ध कागदपत्रे, पुरावे आणि नोंदींची सखोल छाननी करून निर्णय दिल्याचे सांगत पाटील यांनी तक्रारदार सुरेंद्र गुदगे यांनी उपस्थित केलेले आक्षेप समितीने ग्राह्य धरले नसल्याचे नमूद केले. कायदेशीर प्रक्रियेनंतर आपल्या बाजूने निर्णय झाल्याने समाधान व्यक्त करत त्यांनी अखेर सत्याचाच विजय झाला, अशी प्रतिक्रिया दिली.
यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर यांनी या प्रकरणावर भाष्य करत सुरेंद्र गुदगे यांनी केलेली तक्रार समितीने फेटाळल्यामुळे वस्तुस्थिती स्पष्ट झाल्याचे सांगितले. खटाव तालुक्यातील राजकीय घडामोडींचा उल्लेख करत त्यांनी आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्येही भाजप आपले वर्चस्व कायम ठेवेल, असा विश्वास व्यक्त केला.
सुरज पाटील यांनी ग्रामविकास मंत्री तथा माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली तालुक्यात विकासकामांसह भाजपची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत झाल्याचे सांगितले. जात वैधतेच्या प्रक्रियेत दीर्घकाळ संघर्ष करावा लागला असला, तरी सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर समितीने दिलेल्या निर्णयामुळे न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. या निर्णयानंतर मायणी परिसरातील राजकीय चर्चांना पुन्हा उधाण येण्याची शक्यता असून, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रकरणाकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.