सातारा : सातारा नगरपरिषदेच्या बांधकाम विभागातील कनिष्ठ अभियंता प्रदीप भाऊ साबळे यांच्या पुनर्नियुक्ती अथवा सेवामुदतवाढीच्या प्रस्तावास ॲड. वैभव राजेंद्र मोरे यांनी लेखी हरकत घेतली आहे. यासंदर्भात मुख्याधिकारी, नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनात म्हटले आहे की, प्रदीप साबळे हे सन २०२४-२५ मध्ये सेवानिवृत्त झाले असून त्यांना पुन्हा सेवेत घेण्याबाबतचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती मिळाली आहे. मात्र, या संदर्भात माहितीच्या अधिकाराखाली मागविलेली संपूर्ण माहिती अद्याप उपलब्ध करून देण्यात आलेली नसून प्रथम अपीलही प्रलंबित आहे. त्यामुळे आवश्यक कागदपत्रे व शासनमान्यता स्पष्ट होण्यापूर्वी पुनर्नियुक्तीचा निर्णय घेणे योग्य ठरणार नाही, असा आक्षेप मोरे यांनी नोंदविला आहे.
या प्रकरणी नगर विकास विभाग, विभागीय आयुक्त, पुणे तसेच जिल्हाधिकारी, सातारा यांच्याकडेही लेखी तक्रार करण्यात आल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. तसेच जिल्हा सहआयुक्त (नगरपालिका प्रशासन) यांनी मुख्याधिकाऱ्यांकडून अहवाल मागविलेला असताना पुनर्नियुक्तीची प्रक्रिया घाईघाईने का राबविली जात आहे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
मोरे यांनी म्हटले आहे की, जिल्ह्यात हजारो सुशिक्षित, पात्र आणि तांत्रिकदृष्ट्या सक्षम युवक रोजगाराच्या प्रतीक्षेत असताना वारंवार सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनाच सेवामुदतवाढ किंवा पुनर्नियुक्ती देण्याची भूमिका योग्य नाही. नगरपरिषद प्रशासनाने नव्या पिढीतील गुणवंत अभियंते व सुशिक्षित बेरोजगार युवकांना संधी दिल्यास प्रशासनात नवे विचार, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आणि अधिक कार्यक्षमतेने काम होण्यास मदत होईल.
तसेच सातारा नगरपरिषदेची भव्य-दिव्य नवीन प्रशासकीय इमारत प्रस्तावित असून, या नव्या पर्वात नगराध्यक्षांनी नव्या विचारांच्या, पात्र आणि सक्षम अधिकाऱ्यांच्या व कर्मचाऱ्यांच्या टीमसह कामकाज सुरू करावे. अनेक वर्षे त्याच-त्याच व्यक्तींवर अवलंबून राहण्याऐवजी नव्या पिढीला संधी देणे ही काळाची गरज असल्याचेही मोरे यांनी नमूद केले आहे.
निवेदनाद्वारे त्यांनी साबळे यांच्या पुनर्नियुक्तीचा प्रस्ताव स्थायी समितीसमोर सध्या मांडू नये, संपूर्ण प्रशासकीय व कायदेशीर पडताळणी करावी, पुनर्नियुक्तीसाठी आवश्यक शासन मान्यता व संबंधित कागदपत्रे सार्वजनिक करावीत तसेच नगरपरिषदेतील रिक्त पदे शासनाच्या नियमांनुसार पारदर्शक भरती प्रक्रियेद्वारे भरून सुशिक्षित बेरोजगार युवकांना प्राधान्य द्यावे, अशी मागणी केली आहे.
सातारा नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष यांनीही सुशिक्षित बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याची आवश्यकता मान्य केली. याबाबत सादर करण्यात आलेल्या निवेदनाचा सकारात्मक विचार करू, असे आश्वासन त्यांनी दिल्याची माहिती ॲड. वैभव मोरे यांनी दिली.