दिल्ली : वर्षांनुवर्षे प्रलंबित असलेले खटले हे आपल्याकडील न्यायव्यवस्थेचं एक कटू सत्य आहे. त्यामुळे अनेक वर्षे लोटल्यानंतरही एखाद्या खटल्याचा निकाल लागल नाही. तसेच जेव्हा निकाल लागतो तोपर्यंत बराच उशीर झालेला असतो. अशीच एक घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशमध्ये १९७७ साली झालेल्या एका हत्या प्रकरणातील पाच आरोपींची सर्वोच्च न्यायालयाने तब्बल ४९ वर्षांनंतर निर्दोष मुक्तता केली आहे. यापैकी दोन आरोपींचा आधीच मृत्यू झाला आहे. तर उर्वरित तिघांची या निकालानंतर मुक्तता झाली आहे.
याबाबत मिळालेल्या अधिक माहितीनुसार उत्तर प्रदेशमधील गोंडा जिल्ह्यातील कंचनपूर गावाजवळ २८ जून १९७७ रोजी हरिहर शरण नावाच्या व्यक्तीची हत्या झाली होती. हरिहर शरण याच्यावर सहा जणांनी भाले, काठ्या आणि इतर हत्यारांद्वारे हल्ला केला होता. या प्रकरणी ट्रायल कोर्टाने १९८१ साली आरोपींना दोषी ठरवले होते. तर हायकोर्टाने २०११ साली आरोपींची शिक्षा कायम ठेवली होती. त्यानंतर आरोपींनी याप्रकरणी सुप्रीम कोर्टात दाद मागितली होती.
या याचिकेवर सुनावणी करताना न्यायमूर्ती विक्रम नाथ आणि न्यायमूर्ती संदीप मेहता यांच्या खंडपीठाने तपासातील गंभीर त्रुटी आणि एफआयआर पाठवण्यात झालेल्या उशिराच्या आधारावर ट्रायल कोर्ट आणि हायकोर्टाने दिलेला निकाल फिरवला. सरकारी पक्ष आरोपींवरील गुन्हा सिद्ध करण्यात अपयशी ठरला, असे कोर्टाने स्पष्टपणे नमूद केले. तसेच सरकारी पक्षाच्या प्रक्रियेत गंभीर त्रुटीही दिसून आळ्या. त्यामुळे एफआयआर मॅजिस्ट्रेटपर्यंत पाठवण्यात विनाकारण उशीर झाला होता.
एवढंच नाही तर पोलिसांनी दाखल केलेल्या एफआयआरमध्ये त्रुटी आढळल्या. तसेच या प्रकरणातील प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांच्या उपस्थितीबाबतही शंका उपस्थित झाली. त्यावरून कोर्टाने सुभेदार, हीरा लाल आणि राज बक्स यांचं अपील मान्य करत ट्रायल कोर्ट आणि अलाहाबाद हायकोर्टाने दिलेला निर्णय सर्वोच्च न्यायालयाने रद्द केला. कनिष्ठ न्यायालयांनी आरोपींना भादंवि कलम १४८ आणि ३०२ (कलम १४९ सह) अन्वये दोषी ठरवले होते. तर दोन आरोपींचा सुनावणीदरम्यान मृत्यू झाल्याने त्यांच्यावरील खटला संपुष्टात आला होता. तर एका आरोपीचा हायकोर्टात खटला प्रलंबित असताना मृत्यू झाला होता.