सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाकडून गंभीर चिंता; केंद्र सरकारला नियमित वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश

by Team Satara Today | published on : 16 July 2026


दिल्ली : गेल्या 19 दिवसांपासून जंतर-मंतर येथे बेमुदत उपोषण करत असलेले सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीबाबत दिल्ली उच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. त्यांच्या आरोग्य आणि सुरक्षेसंदर्भात दाखल करण्यात आलेल्या जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने केंद्र सरकारला नियमित वैद्यकीय तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

सुनावणीदरम्यान केंद्र सरकारतर्फे सॉलिसिटर जनरल यांनी न्यायालयाला सांगितले की, या प्रकरणात यापूर्वीच नोटीस बजावण्यात आली असून सोनम वांगचुक यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. त्यांची दररोज आरोग्य तपासणी केली जाते आणि आवश्यक ती वैद्यकीय माहिती त्यांना तसेच त्यांच्या सहकाऱ्यांना दिली जात आहे.

यावर उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, सरकारी डॉक्टरांकडून नियमित वैद्यकीय तपासणी केली जावी आणि डॉक्टरांच्या अहवालानुसार आवश्यक वाटल्यास तातडीने योग्य वैद्यकीय हस्तक्षेप करण्यात यावा. "प्रत्येक नागरिकाचं आयुष्य अनमोल आहे आणि ते वाचवण्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न झाले पाहिजेत," असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले.

सॉलिसिटर जनरल यांनीही न्यायालयाच्या भूमिकेशी सहमती दर्शवत, प्रत्येक नागरिकाचा जीव महत्त्वाचा असल्याचे सांगितले. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार जे काही आवश्यक असेल, ती सर्व मदत सरकारकडून केली जाईल, असे त्यांनी न्यायालयाला आश्वासन दिले.

जनहित याचिकेत सोनम वांगचुक यांच्या सतत खालावत चाललेल्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त करण्यात आली आहे. त्यावर सरकारने न्यायालयाला सांगितले की, सरकारी डॉक्टर आणि संबंधित क्षेत्रातील तज्ज्ञ त्यांच्या प्रकृतीवर सातत्याने लक्ष ठेवून आहेत आणि परिस्थितीनुसार आवश्यक ती सर्व वैद्यकीय पावले उचलली जातील.

सरकारच्या या भूमिकेची दखल घेत दिल्ली उच्च न्यायालयाने समाधान व्यक्त केले. तसेच, डॉक्टरांच्या वैद्यकीय मतानुसार योग्य वेळी आवश्यक उपचार आणि हस्तक्षेप करण्यात यावा, असे निर्देश देत न्यायालयाने या प्रकरणातील सुनावणी पूर्ण केली. सोनम वांगचुक यांच्या उपोषणामुळे त्यांच्या प्रकृतीबाबत देशभरात चिंता व्यक्त केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विठ्ठलाने पावसाच्या रूपाने आशीर्वाद द्यावा, राज्यात चांगला पाऊस पडावा - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले
पुढील बातमी
E20 पेट्रोलमुळे कारमध्ये गंभीर बिघाड झाल्याचा दावा; ग्राहक आयोगाचा ऐतिहासिक निर्णय, कंपनीला नवी कार देण्याचे आदेश

संबंधित बातम्या