कराड तालुक्यात समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग; खरीप पेरणीची टक्केवारी 41.93 टक्क्यांवर

by Team Satara Today | published on : 16 July 2026


कराड : कराड तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना चांगलाच वेग आला आहे. शेतकऱ्यांनी पावसाच्या उघडीपिचा फायदा घेत मोठ्या प्रमाणावर पेरण्या पूर्ण केल्या असून, तालुक्यात एकूण 31 हजार 127 हेक्टर नियोजित खरीप क्षेत्रापैकी 13 हजार 53 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. त्यामुळे खरीप पेरणीची टक्केवारी 41.93 टक्क्यांवर पोहोचली आहे.

कृषी विभागाच्या प्राथमिक आकडेवारीनुसार, यंदा भाताचे 2 हजार 255 हेक्टर, खरीप ज्वारीचे 461 हेक्टर, सोयाबीनचे 6 हजार 236 हेक्टर, भुईमुगाचे 4 हजार 66 हेक्टर आणि मक्याचे 9.30 हेक्टर क्षेत्रावर पेरणी पूर्ण झाली आहे. यामध्ये सोयाबीन व भुईमूग पिकांकडे शेतकऱ्यांचा अधिक कल असल्याचे चित्र स्पष्ट होत आहे. दरम्यान, तालुक्यात नवीन ऊस लागवड 3 हजार 545 हेक्टर क्षेत्रावर झाली असून, ऊस लागवडीलाही शेतकऱ्यांनी प्राधान्य दिले आहे. पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने पेरणीनंतर उगवण समाधानकारक होत असल्याचे कृषी तज्ज्ञांनी सांगितले.

मात्र, काही भागांत अद्याप अपेक्षित पाऊस न झाल्याने शेतकरी पुढील पावसाकडे डोळे लावून बसले आहेत. पिकांची जोमदार वाढ, खत व्यवस्थापन आणि तण नियंत्रणासाठी पुढील आठवडाभरातील पावसाची स्थिती महत्त्वाची ठरणार आहे. कृषी विभागाने शेतकऱ्यांना पिकांची नियमित पाहणी करून रोग व किडीच्या प्रादुर्भावावर वेळीच उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

जुलैच्या पहिल्या आठवड्यात पावसाची सुरुवात समाधानकारक झाल्याने खरीप हंगामाबाबत आशादायक वातावरण निर्माण झाले असून, आगामी काही दिवसांत पेरणीचा टक्का झपाट्याने वाढण्याची शक्यता कृषी विभागाने व्यक्त केली आहे. शेतकऱ्यांमध्येही यंदा चांगल्या उत्पादनाची अपेक्षा व्यक्त होत आहे. पुढील काळात पावसाने साथ द्यावी अशी शेतकऱ्यांची भावना आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व; शुद्ध पाणी, हेच निरोगी आरोग्याचे गमक
पुढील बातमी
विठ्ठलाने पावसाच्या रूपाने आशीर्वाद द्यावा, राज्यात चांगला पाऊस पडावा - सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले

संबंधित बातम्या