ग्रामीण पाणी गुणवत्ता व्यवस्थापन आणि शुद्ध पाणी पुरवठ्याचे महत्त्व; शुद्ध पाणी, हेच निरोगी आरोग्याचे गमक

वर्षा पाटोळे, जिल्हा माहिती अधिकारी,सातारा

by Team Satara Today | published on : 16 July 2026


ग्रामीण भागात प्रत्येक कुटुंबाला शुद्ध, पुरेसा आणि नियमित पाणीपुरवठा करणे ही ग्रामपंचायतीची प्राथमिक जबाबदारी आहे. परंतु, अनेकदा विविध कारणांमुळे पाणी प्रदूषित होते आणि गावात साथीच्या रोगांचा प्रादुर्भाव होतो. म्हणूनच पाणी गुणवत्ता व्यवस्थापन, नियमित सर्वेक्षण आणि गावातील जबाबदार घटकांची भूमिका समजून घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे.

पाण्यात जेंव्हा अपायकारक रोगजंतू (जिवाणू, विषाणू), विषारी रसायने, अतिरिक्त क्षार, सांडपाणी किंवा माती मिसळते, तेव्हा ते पाणी असुरक्षित किंवा अशुद्ध मानले जाते. असे दूषित पाणी प्यायल्याने टायफॉईड, कॉलरा, अतिसार (हगवण), गॅस्ट्रो आणि कावीळ यांसारखे गंभीर आजार पसरतात.

पाणी कर्मचाऱ्यांमध्ये शुद्धीकरणाच्या योग्य कौशल्यांची कमतरता असणे. स्त्रोताजवळील अस्वच्छता: पाण्याच्या स्त्रोताजवळ कपडे-भांडी धुणे, जनावरे धुणे, सांडपाणी सोडणे किंवा खतखड्डे व शौचालये असणे. पाईपलाईन, व्हॉल्व किंवा पाण्याच्या टाकीमध्ये गळती असणे, तसेच खाजगी नळजोडणी गटारातून/नालीतून देणे, शेतातील रासायनिक खते, कीटकनाशके आणि कारखान्यांमधील रसायने पाण्यात मिसळणे, ब्लीचिंग पावडरची चुकीची साठवणूक आणि अयोग्य डोस ही अशुद्ध पाणीपुरवठा होण्याची मुख्य कारणे आहेत. 

पाण्याची गुणवत्ता ठरवण्यासाठी केंद्र सरकारने भारतीय मानक संस्था (IS 10500:2012) नुसार मानके ठरवून दिली आहेत. यासाठी दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. फील्ड टेस्ट किट (FTK) द्वारे तपासणी व गावातील पाण्याचे नमुने तपासण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीकडे 'फील्ड टेस्ट किट' असणे आवश्यक आहे.

पाण्यातील सूक्ष्म रोगजंतू मारण्यासाठी ब्लीचिंग पावडर (T.C.L.) चा वापर केला जातो. चांगल्या ब्लीचिंग पावडरमध्ये किमान ३३% क्लोरीन असणे आवश्यक आहे. क्लोरीन हवेत उडून जाऊ नये म्हणून ती कोरड्या व सावलीच्या जागी हवाबंद डब्यात ठेवावी. ३०% पेक्षा जास्त क्रियाशील क्लोरीन असलेली ब्लीचिंग पावडर १,००० लिटर पाण्यासाठी ५ ग्रॅम या प्रमाणात वापरावी. ब्लीचिंग पावडरची आधी बादलीत पेस्ट करावी, त्यात पाणी मिसळून ते स्थिरावू द्यावे. त्यानंतर फक्त वरची स्वच्छ 'निवळी' साठवण टाकीच्या पाण्यात मिसळावी. पाणी पुरवठ्याच्या किमान १ तास आधी हे क्लोरिनेशन करावे.

ग्रामपंचायतींनी गावातील सर्व कुटुंबांना पुरेसा, स्वच्छ व नियमित पाणीपुरवठा करणे आवश्यक आहे. यासाठी पाणी पुरवठा योजना आणि स्वच्छता विषयक कामांवर नियंत्रण ठेवणे. पाण्याचे दैनंदिन आणि नियमित शुद्धीकरण (क्लोरिनेशन) करणे. दररोज वेगवेगळ्या नळांमधून पाणी घेऊन ओ.टी. टेस्ट करणे व त्याची नोंद ठेवणे. मार्गदर्शक सूचनेनुसार पाण्याचे रासायनिक नमुने (वर्षातून २ वेळा - पावसाळ्यापूर्वी व पावसाळ्यानंतर) आणि जैविक नमुने (वर्षातून २ वेळा) गोळा करून जिल्हा, उपविभागीय प्रयोगशाळेत तपासणीसाठी पोहोचवणे महत्वाचे आहे.

यासाठी ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची स्थापना केली जाते. गावात चांगल्या दर्जाच्या ब्लीचिंग पावडरचा पुरेशा प्रमाणात साठा उपलब्ध ठेवणे. वार्षिक पाणी गुणवत्ता तपासणीचा कृती आराखडा तयार करणे. नियमित ओ.टी. परीक्षण आणि फील्ड टेस्ट किटद्वारे घेतलेल्या चाचण्यांचा मासिक अहवाल दरमहा ५ तारखेपर्यंत तालुका समितीला सादर करणे. दूषित पाण्याच्या स्त्रोतांवर नागरिकांच्या माहितीसाठी चेतावणी फलक लावणे आणि पाणी गुणवत्तेची माहिती गावात सार्वजनिक ठिकाणी प्रसिद्ध करणे ही ग्राम पाणी पुरवठा व स्वच्छता समितीची कामे आहेत.

शुद्ध पाणी, हेच निरोगी आरोग्याचे गमक आहे. गावातील जलस्रोत स्वच्छ ठेवून, नियमित क्लोरिनेशन आणि योग्य सर्वेक्षणाच्या माध्यमातून आपण आपल्या गावाला जलजन्य आजारांपासून मुक्त ठेवू शकतो. यामध्ये सरपंच, ग्रामसेवक, जलसुरक्षक आणि स्वच्छता समितीचा सक्रिय सहभाग हाच खऱ्या अर्थाने महत्वाचा आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्याचे नेते दिवंगत अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश, मागणी मान्य
पुढील बातमी
कराड तालुक्यात समाधानकारक पावसामुळे खरीप हंगामातील पेरणीच्या कामांना वेग; खरीप पेरणीची टक्केवारी 41.93 टक्क्यांवर

संबंधित बातम्या