विठ्ठलाच्या ओढीने धावणाऱ्या पावलांना बळ देतेय चरणसेवा ; मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचा उपक्रम

by Team Satara Today | published on : 15 July 2026


सातारा : विठ्ठलाच्या भेटीच्या ओढीने पंढरीकडे धावणाऱ्या वारकऱ्यांच्या थकलेल्या चरणांची सेवा आणि त्या माध्यमातून पुढे चालण्यास बळ देणारा चरण सेवा उपक्रम हजारो वारकऱ्यांचा थकवा दूर करून त्यांचे आशीर्वाद घेत आहे. आषाढी वारीदरम्यान पंढरपूरकडे पायी जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांना मोफत आरोग्यसेवा आणि चरणसेवेचा लाभ मिळावा, यासाठी मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षातर्फे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील 'चरणसेवा' उपक्रम यंदाही राबविण्यात येत आहे. 

या वर्षीही सेवा केंद्रांवर डॉक्टर, फिजिओथेरपिस्ट, परिचारिका, पॅरामेडिकल कर्मचारी, वैद्यकीय विद्यार्थी आणि स्वयंसेवक कार्यरत असून, औषधी आयुर्वेदिक तेल, रुग्णवाहिका यासह सेवा करण्यात येत आहे.

आज जर्मन टेन्ट, तरडगाव रोड, बाळूपाटलाची वाडी येथे मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातर्फे चरणसेवा उपक्रमात आर्यांग्ल वैद्यक महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी १४७० वारकऱ्यांच्या, संजीवन नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी १५५० वारकऱ्यांच्या, महालक्ष्मी नॅचरोपॅथी कॉलेज रायगावच्या विद्यार्थ्यांनी १५७५ वारकऱ्यांना,

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय साताराच्या विद्यार्थ्यांनी ४४० वारकऱ्यांना  पायाला तेल लावून मसाज करत चरण सेवा दिली. तर २२८ वारकऱ्यांचे ड्रेसिंग केले. यशवंत आयुर्वेद महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी ७६० वारकऱ्यांना चरण सेवा दिली. बाह्य रुग्ण विभागाने ३६० वारकऱ्यांची तपासणी केली व औषधोपचार केले.

जिज्ञासा आणि आखिल भारतीय विद्यार्थी परिषद यांनी १६८० चरण सेवा दिली. बाह्य रुग्ण विभागाने ३८० वारकऱ्यांवर औषध उपचार केले. जीपी असोसिएशन सातारा यांच्याकडून जनता अर्बन बँक येथे मोफत उपचार शिबिर आयोजित करण्यात आले  यात ५२० रुग्णांनी लाभ घेतला. आज दिवसभरात ७४७५ वारकऱ्यांची चरण सेवा करण्यात आली.

बाह्य रुग्ण विभागा मार्फत १२६० वारकऱ्यांची तपासणी करण्यात आली. २८० वारकऱ्यांना ड्रेसिंग करण्यात आले. यामध्ये २१५ स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. मुख्यमंत्री सहायता कक्षामार्फत राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमाचा वारकऱ्यांना लाभ होत असून त्यांच्यातून समाधान व्यक्त होत आहे अशी माहिती या कक्षाचे समन्वयक डॉ. रविराज निकम यांनी दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मुलाच्या वियोगाने आलेल्या नैराश्यातून दाम्पत्याने केले विषारी औषध प्राशन; दोघांचाही मृत्यू
पुढील बातमी
राज्याचे नेते दिवंगत अजित पवार यांची जयंती अधिकृतपणे साजरी होणार; शासकीय कार्यक्रमांच्या यादीत समावेश, मागणी मान्य

संबंधित बातम्या