फलटण : आषाढी वारी पालखी सोहळ्यादरम्यान नीरा नदीवरील पुलावरून पडलेल्या एका वारकऱ्याचे राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाने (एनडीआरएफ) तत्परतेने बचावकार्य करून प्राण वाचवले. गणेश शंकर भिसे (वय ४२) असे जखमी वारकऱ्याचे नाव आहे.
आज, बुधवारी (दि.१५) सकाळच्या सुमारास ही घटना घडली. वारकरी गणेश भिसे हे नीरा नदीवरील पुलावरून जात असताना अचानक तोल जाऊन नदीपात्रात पडले. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी बंदोबस्तासाठी तैनात असलेल्या एनडीआरएफच्या पथकाने तात्काळ धाव घेत बचावकार्य सुरू केले. निरीक्षक दिलीप कुमार यांच्या नेतृत्वाखालील 5 एल डी/05 बटालियन एनडीआरएफच्या जवानांनी अत्यंत तत्परतेने नदीत उतरून संबंधित व्यक्तीला सुरक्षित बाहेर काढले.
बचावानंतर जखमी व्यक्तीस प्राथमिक मदत देण्यात आली. त्यानंतर पुढील उपचारासाठी त्यांना नागरी प्रशासनाच्या वैद्यकीय पथकाकडे सुपूर्द करण्यात आले. एनडीआरएफच्या जवानांनी दाखविलेल्या सतर्कता, तत्परता आणि धाडसामुळे अनर्थ टळला. आषाढी वारीच्या पार्श्वभूमीवर नीरा नदी परिसरात एनडीआरएफचे पथक दक्षतेने कार्यरत असून या यशस्वी बचाव कारवाईचे वारकरी आणि नागरिकांकडून कौतुक होत आहे.