सातारा जिल्हा परिषद अध्यक्ष प्रकरणातील अहवाल दक्षता पथकाने तत्काळ द्यावा; जात प्रमाणपत्र समितीचा आदेश, १६ रोजी राष्ट्रवादीच्या फुटीर सदस्य अपात्रता प्रकरणाची सुनावणी

by Team Satara Today | published on : 15 July 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषद अध्यक्षांच्या कुणबी जात प्रमाणपत्राविरोधातील तक्रारीवर मंगळवारी जिल्हा जात प्रमाणपत्र समिती कार्यालयात सुनावणी झाली. या वेळी तक्रारदारांच्या वतीने म्हणणे सादर झाल्यानंतर जात प्रमाणपत्र समितीने दक्षता पथकाला आपला अहवाल तत्काळ सादर करावा, असा आदेश दिला आहे. तर जिल्हाधिकारी कार्यालयात दि. १६ जुलै रोजी राष्ट्रवादीच्या फुटीर सदस्य अपात्रता प्रकरणाची पुढील सुनावणी होणार आहे.

सातारा जिल्हा परिषदेचे अध्यक्षपद ओबीसी प्रवर्गातील महिलेसाठी राखीव होते. निवडणुकीनंतर अध्यक्षपदाची निवडणूक या वर्षी २० मार्च रोजी पार पडली. या वेळी अध्यक्षपदी भाजपच्या प्रिया शिंदे यांची निवड झाली. या निवडीविरोधात माण तालुक्यातील मलवडी येथील जयदीप मगर आणि खटाव तालुक्याच्या विसापूर येथील संतोष साळुंखे यांनी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात तक्रार अर्ज दिला होता. प्रिया शिंदे या जिल्हा परिषदेच्या खटाव या खुल्या गटातून निवडून आल्या आहेत. निवडणूक लढविताना त्यांनी नामनिर्देशन पत्रात जातीचा उल्लेख केवळ मराठा असा केलेला आहे. 

पण, अध्यक्षपदाची निवडणूक लढविण्यासाठी त्यांनी ओबीसी जातीचे प्रमाणपत्र हे कुटुंबाची खोटी वंशावळ, खोटी कागदपत्रे, चुकीचे पुरावे देऊन आणि मूळ रहिवासी ठिकाण लपवून तसेच तहसीलदार व प्रांताधिकारी यांच्याशी संगनमत करून काढलेले आहे, असे तक्रारीत म्हटले आहे. त्यामुळे याबाबत जिल्हा जात प्रमाणपत्र समिती कार्यालयात सुनावणी सुरू आहे. मंगळवारीही सुनावणी झाली. यामध्ये तक्रारदारांचे वकील ॲड. दत्तात्रय घोडके यांनी युक्तिवाद केला.

सातारा जिल्हा जात प्रमाणपत्र समितीसमोर तक्रारदारांच्या वतीने अॅड. घोडके यांनी म्हणणे मांडले. दक्षता पथकाकडे संबंधित कागदपत्रांची संचिका तपासणीसाठी दिली आहे. एक महिना झाला तरी दक्षता पथकाने अहवाल दिलेला नाही. दक्षता पथकाकडून त्वरित अहवाल मागून घ्यावा, असा युक्तिवाद करण्यात आला. यावर समितीने दक्षता समितीला तत्काळ अहवाल सादर करण्याची सूचना केली. त्यामुळे या प्रकरणाच्या पुढील सुनावणीसाठी नवीन तारीख निश्चित करण्यात येणार आहे.

तीन सदस्यांचे अपात्रता प्रकरण...

जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीवेळी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) तिघा सदस्यांनी भाजप उमेदवाराला मतदान केले होते. त्यामुळे या सदस्यांविरोधात जिल्हाधिकारी यांच्याकडे अपात्रतेसंदर्भात तक्रार आहे. यावर मंगळवारी सुनावणी झाली. तक्रारदारांच्या वतीने अॅड. दत्तात्रय घोडके यांनी युक्तिवाद केला. त्यानंतर याप्रकरणाची पुढील सुनावणी घेण्यासाठी दि. १६ जुलै ही तारीख निश्चित करण्यात आली. कामेश कांबळे, लता कर्णे आणि ऋतुजा जगताप या तीन सदस्यांविरोधात अपात्रता तक्रार आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पालखी सोहळ्याच्या बंदोबस्तावरून परतणाऱ्या सांगलीकडे परतणाऱ्या पोलिसाच्या कारला सुरवडी येथे अपघात; पाच जण जखमी
पुढील बातमी
नीरा नदीवरील पुलावरून पडलेल्या एका वारकऱ्याचे एनडीआरएफच्या पथकाने वाचवले प्राण

संबंधित बातम्या