फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्याच्या बंदोबस्ताची जबाबदारी पूर्ण करून सांगलीकडे परतणाऱ्या पोलिसांच्या वाहनाला पुणे–पंढरपूर महामार्गावर सुरवडी (ता. फलटण) येथे अपघात झाला. या अपघातात वाहनातील पाच जण जखमी झाले असून त्यापैकी दोघांना गंभीर दुखापत झाल्याची माहिती मिळाली आहे.
मिरज ग्रामीण पोलीस दलातील संजय जगन्नाथ जोडगे (वय ५४) हे सहकाऱ्यांसह बंदोबस्ताची ड्युटी संपवून आपल्या चारचाकी वाहनाने (क्र. एमएच ०९ सीएम ६३८७) सांगलीकडे निघाले होते. सुरवडीजवळ फलटणच्या दिशेने प्रवास करत असताना पाठीमागून भरधाव वेगाने आलेल्या हिरव्या रंगाच्या, नंबर प्लेट नसलेल्या चारचाकी वाहनाने त्यांच्या गाडीला बाजूने धडक दिल्याचा आरोप करण्यात आला आहे.
धडकेनंतर जोडगे यांच्या वाहनावरील नियंत्रण सुटले आणि गाडी दुभाजकावर आदळून पलटी झाली. अपघाताच्या वेळी वाहनाच्या शेजारी वारकऱ्यांचा टेम्पो प्रवास करत होता. मात्र सुदैवाने मोठी दुर्घटना टळली. अपघात होताच परिसरातील वारकऱ्यांनी तत्काळ मदतीसाठी धाव घेत जखमींना बाहेर काढले. तसेच जवळच असलेल्या फिरत्या आरोग्य केंद्रामार्फत प्राथमिक उपचारही करण्यात आले.
अपघातग्रस्त वाहनात संजय जगन्नाथ जोडगे (५४), सागर संजय जोडगे (३०), योगेश रावसाहेब चौगुले (२५) तसेच अन्य दोन जण प्रवास करत होते. सर्व पाच जण जखमी झाले असून दोघांची प्रकृती गंभीर असल्याचे समजते. विशेष म्हणजे, अपघातग्रस्त स्वतः पोलीस कर्मचारी असतानाही त्यांना सुमारे तासभर पोलीस मदत मिळू शकली नसल्याची खंत उपस्थितांनी व्यक्त केली.
दरम्यान, अपघातानंतर वाहन दुभाजकात अडकल्यामुळे ते विरुद्ध दिशेच्या लेनमध्ये गेले नाही. अन्यथा त्या मार्गावरून मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या वारकऱ्यांमध्ये मोठी जीवितहानी होण्याची शक्यता होती. दैव बलवत्तर असल्याने वारकरी तसेच इतर प्रवासी या संभाव्य मोठ्या दुर्घटनेतून बचावल्याची भावना घटनास्थळी व्यक्त करण्यात आली.