श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणंदनगरी नटली; नगरपंचायतीकडून सर्व सुविधांचे युद्धपातळीवर नियोजन

by Team Satara Today | published on : 15 July 2026


लोणंद : श्री संतश्रेष्ठ ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी लोणंद नगरपंचायतीने सर्व यंत्रणा सज्ज केली आहे. वीज, पाणी, आरोग्य, स्वच्छता, वाहतूक व वारकऱ्यांच्या सोयी सुविधांची कामे युद्धपातळीवर पूर्ण करण्यात आली आहेत. त्यामुळे माऊलींच्या आगमनासाठी लोणंद नगरी पूर्णपणे सज्ज झाली असल्याची माहिती नगराध्यक्षा मधुमती गालिंदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी आणि मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड यांनी दिली.

लोणंदच्या पालखी तळावर करण्यात आलेल्या विविध कामांची पाहणी करताना त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. यावेळी नगरसेवक शिवाजीराव शेळके, सागर शेळके तसेच नगरपंचायतीचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

नगरपंचायतीने पालखी तळाचे मुरमीकरण करून संपूर्ण परिसर सुस्थितीत आणला आहे. जेसीबी, ट्रॅक्टर, रोलर यांच्या सहाय्याने पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात आली असून धोकादायक बाभळीची झाडे काढण्यात आली आहेत. पालखी तळावरील धोबीघाटाची दुरुस्ती व स्वच्छता करण्यात आली असून नव्याने फीडिंग पॉइंट उभारण्यात आला आहे. विविध ठिकाणी एकूण दहा फीडिंग पॉइंटद्वारे टँकर भरण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महिला वारकऱ्यांसाठी स्वतंत्र तात्पुरती स्नानगृहे उभारण्यात आली असून संपूर्ण पालखी तळ फ्लड लाईटच्या प्रकाशाने उजळून निघणार आहे. हिरकणी कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. सार्वजनिक शौचालयांसाठी १४ ठिकाणी स्वच्छता व विद्युत जोडणीची व्यवस्था करण्यात आली आहे. सर्व दिंड्यांच्या विसाव्याच्या ठिकाणी साफसफाई करून डासांचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी फॉगिंग मशिनद्वारे धूर फवारणी करण्यात आली आहे.

पाणीपुरवठा विभागाने गावठाण, जांभळीचा मळा, बेलाचा मळा, इंदिरानगर, वेअरहाऊस व दगडवस्ती येथील जलसाठ्यांचे निर्जंतुकीकरण केले असून मोटारी, व्हॉल्व्ह आणि चेंबरची दुरुस्ती पूर्ण केली आहे. पाणी शुद्धीकरणासाठी आवश्यक टीसीएल व तुरटीचा पुरेसा साठा उपलब्ध करून देण्यात आला आहे. फिरत्या शौचालयांसाठी तसेच पालखी तळावरील वारकऱ्यांसाठी पुरेशा पाण्याचे नियोजन करण्यात आले असून आवश्यक ठिकाणी पाणीटँकर वेळेत पोहोचतील, अशी व्यवस्था करण्यात आली आहे.

आरोग्य विभागाने सार्वजनिक शौचालयांची दुरुस्ती, गटारांची स्वच्छता, चेंबर दुरुस्ती तसेच जंतुनाशक पावडर, फिनेल, अॅसिड व इतर साहित्याचा साठा उपलब्ध करून ठेवला आहे. पालखी तळावर सुलभ शौचालयाची सुविधाही उपलब्ध करण्यात आली आहे. नगरातील सर्व प्रमुख रस्ते, चौक, वाड्या-वस्त्यांवरील रस्त्यावरील दिव्यांची दुरुस्ती करण्यात आली असून प्रमुख चौकांमध्ये हायमास्ट व फ्लडलाईटची व्यवस्था करण्यात आली आहे. रस्त्यांच्या कडेला वाढलेली झाडे हटवणे, खड्डे बुजवणे, खुल्या जागांची स्वच्छता, मदत केंद्र, आरोग्य केंद्र, पोलिस मदत केंद्र, अग्निशमन सेवा आणि वारकऱ्यांसाठी स्नानगृह अशा सर्व अत्यावश्यक सुविधांची तयारी पूर्ण करण्यात आली आहे.

नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष, सर्व नगरसेवक, समिती सभापती, मुख्याधिकारी आणि नगरपंचायतीचे अधिकारी-कर्मचारी यांच्या समन्वयातून पालखी सोहळा शांततेत, सुरक्षित व निर्विघ्न पार पडावा, यासाठी सर्वंकष नियोजन करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भूजल संवर्धनात साताऱ्याची वाटचाल : जलसुरक्षेचा भक्कम पाया
पुढील बातमी
राज्यस्तरीय प्रकल्प मूल्यमापन समितीच्या उपाध्यक्षपदी (सहअध्यक्ष) ना. मकरंद पाटील यांची नियुक्ती

संबंधित बातम्या