हरिनामाच्या गजरात दुमदुमला सातारा जिल्हा; माऊलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत; पाडेगावात उसळला भक्तीचा महासागर

by Team Satara Today | published on : 15 July 2026


सातारा : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्‍वर माऊलींच्या पालखीचे बुधवारी सातारा जिल्ह्यातील पाडेगाव येथे भक्ती, श्रद्धा आणि उत्साहाच्या वातावरणात भव्य स्वागत करण्यात आले. टाळ-मृदुंगाचा अखंड निनाद, ज्ञानोबा-तुकारामच्या जयघोषाने दुमदुमलेला परिसर, भगव्या पताकांची उधळण आणि हरिनामात तल्लीन झालेले लाखो वारकरी, अशा भक्तिमय वातावरणाने संपूर्ण सातारा जिल्हा भारावून गेला.

आषाढी वारीतील सर्वाधिक भावस्पर्शी आणि परंपरागत विधींपैकी एक असलेला संत ज्ञानेश्‍वर माउलींच्या पादुकांचा नीरा स्नान सोहळा आज भक्तिभावाच्या वातावरणात संपन्न झाला. नीरा नदीच्या दत्तघाटावर वेदमंत्रांच्या घोषात पादुकांना पवित्र जलाभिषेक करण्यात आला. यावेळी ज्ञानोबा-तुकाराम आणि माऊली-माऊलीच्या अखंड जयघोषाने परिसर दुमदुमून गेला.

वाल्हे येथील मुक्कामानंतर संत ज्ञानेश्‍वर महाराजांची पालखी नीरा येथे दाखल झाली. परंपरेनुसार पालखीतून पवित्र पादुका बाहेर काढून धार्मिक विधींच्या साक्षीने त्यांचे नीरा नदीत स्नान घालण्यात आले. या सोहळ्याचे दर्शन घेण्यासाठी नदीच्या दोन्ही तीरांवर हजारो वारकरी आणि भाविकांनी मोठी गर्दी केली होती. टाळ-मृदुंगाचा निनाद, हरिनामाचा गजर आणि वारकर्‍यांच्या भक्तिभावामुळे संपूर्ण परिसर अध्यात्मिक वातावरणाने भारावून गेला.

संत ज्ञानेश्‍वर महाराजांच्या पालखी सोहळ्यातील नीरा स्नान हा अनेक दशकांपासून जपला गेलेला महत्त्वाचा धार्मिक विधी मानला जातो. पुणे जिल्ह्याची सीमा ओलांडून सातारा जिल्ह्यात प्रवेश करण्यापूर्वी पादुकांना नीरा नदीत स्नान घालण्याची परंपरा आजही श्रद्धेने पाळली जाते. या पवित्र क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी कानाकोपर्‍यातून भाविक नीरा येथे दाखल झाले होते.

नीरा नदीतील पारंपरिक स्नानानंतर माऊलींच्या पालखीचे सातारा जिल्ह्यात आगमन होताच जिल्हा प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या वतीने औपचारिक स्वागत करण्यात आले. पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे, जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, जिल्हा परिषद उपाध्यक्ष राजू भोसले तसेच वाईचे प्रांताधिकारी योगेश खरमाटे यांनी पुष्पहार अर्पण करून माऊलींचे दर्शन घेत स्वागत केले. पोलीस बँडच्या सुरेल वादनाने स्वागत सोहळ्याची शोभा अधिक खुलली.

पालखी मार्गावर ठिकठिकाणी वारकर्‍यांनी रांगोळ्या, फुलांची उधळण आणि हरिनामाच्या गजरातून माऊलींचे स्वागत केले. अनेक सामाजिक संस्था, ग्रामस्थ आणि स्वयंसेवी संघटनांनी वारकर्‍यांना पिण्याचे पाणी, फराळ, वैद्यकीय मदत आणि अन्य सेवा उपलब्ध करून दिल्या. माऊलींच्या दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती.

नीरा स्नानाचा विधी पूर्ण झाल्यानंतर संत ज्ञानेश्‍वर महाराजांचा पालखी सोहळा पुढील मुक्कामासाठी लोणंदकडे मार्गस्थ झाला. मार्गभर विविध ठिकाणी ग्रामस्थांनी फुलांची उधळण करत आणि हरिनामाच्या गजरात पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. भक्ती, श्रद्धा आणि परंपरेचा संगम अनुभवायला मिळाल्याने संपूर्ण परिसर वारकरी भावनेने भारावून गेला.

वारकरी संप्रदायाच्या या सोहळ्याच्या पार्श्‍वभूमीवर जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन केले आहे. पालखी मार्गावर पिण्याच्या पाण्याचे टँकर, तात्पुरती आरोग्य केंद्रे, रुग्णवाहिका, स्वच्छतागृहे, स्वच्छता पथके आणि विश्रांतीची व्यवस्था करण्यात आली आहे. वाहतूक सुरळीत राहावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले असून, संपूर्ण पालखी मार्गावर कडक पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. प्रशासनाच्या नियोजनाबद्दल वारकर्‍यांनी समाधान व्यक्त केले.

राजकीय उपस्थितीचीही चर्चा

माऊलींच्या स्वागतासाठी राज्य मंत्रिमंडळातील तीन मंत्र्यांसह जिल्ह्यातील प्रमुख लोकप्रतिनिधी एकाच व्यासपीठावर उपस्थित राहिल्याने या स्वागत सोहळ्याला राजकीय रंगही लाभला. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर प्रमुख नेत्यांनी वारकरी संप्रदायाशी संवाद साधत उपस्थिती लावल्याची चर्चा पालखी मार्गावर रंगली. मात्र, राजकीय चर्चांपेक्षा माऊलीच्या नामस्मरणात तल्लीन झालेल्या वारकर्‍यांसाठी हा दिवस भक्ती, समता आणि वारकरी परंपरेच्या संस्कारांचा उत्सव ठरला.हरिनामाच्या गजरात दुमदुमला सातारा जिल्हा


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जनतेला मूर्ख बनवले जातेय, ट्रस्ट बरखास्त करा - राम मंदिर सीईओ नियुक्तीवर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती संतापले
पुढील बातमी
भूजल संवर्धनात साताऱ्याची वाटचाल : जलसुरक्षेचा भक्कम पाया

संबंधित बातम्या