जनतेला मूर्ख बनवले जातेय, ट्रस्ट बरखास्त करा - राम मंदिर सीईओ नियुक्तीवर शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती संतापले

by Team Satara Today | published on : 14 July 2026


दिल्ली :  राम  मंदिराचे व्यवस्थापन करणाऱ्या श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टने सोमवारी मंदिराच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) पदासाठी अर्ज मागवले. या पदावर होणारी ही पहिलीच नियुक्ती असणार आहे. पदासाठी अर्ज सादन करण्याची अंतिम मुदत १८ जुलै निश्चित करण्यात आली आहे. यावरून जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी राम मंदिर ट्रस्टवर जोरदार निशाणा साधला असून, हा सगळा लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रकार असल्याचे म्हटले आहे. 

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती  म्हणाले की, मुख्य ट्रस्टची स्थापना होत असताना सीईओ पदाची जागा रिक्त असल्याची घोषणा का केली नाही? हा केवळ जनतेची फसवणूक करण्याचा एक डाव असून, ट्रस्टने जे आधीच ठरवले आहे तेच ते करणार आहेत, असा दावाही त्यांनी केला. शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांच्या वक्तव्यानंतर, राम मंदिराची व्यवस्था आणि सध्याच्या ट्रस्टबाबतचा वाद सनातन धर्माच्या विद्वानांमध्ये आणि संतांमध्ये पुन्हा एकदा तीव्र झाल्याचे म्हटले जात आहे. 

राम मंदिर ट्रस्ट बरखास्त करा

जेव्हा ट्रस्टची स्थापना केली जात होत होती, तेव्हा कोणतीही भरती प्रक्रिया झाली नव्हती आणि आता सीईओच्या नियुक्तीसाठी अधिसूचना जारी केली जात आहे. ते आपल्याला हवे ते करू असे सांगून जनतेची निव्वळ फसवणूक करत आहेत. या सगळ्याला काहीच अर्थ नाही, अशी टीका अविमुक्तेश्वरानंद यांनी केली. तसेच राम मंदिर ट्रस्टवर आर्थिक अनियमिततेचे गंभीर आरोप करत बरखास्त करण्याची मागणी केली आहे. जोपर्यंत प्रभू रामाच्या खजिन्याचा अपहार करणारी ट्रस्ट बरखास्त जात नाही आणि तिथे धार्मिक नेत्यांची एक ट्रस्ट स्थापन करून देवतेची सेवा हाती घेतली जात नाही, तोपर्यंत हिंदूंना शांतता मिळणार नाही, असेही ते म्हणाले.

दरम्यान, अयोध्या येथील राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) पदासाठी पहिला अर्ज मंगळवारी आला. हा अर्ज माजी पोलीस महानिरीक्षक अमिताभ ठाकूर यांनी दिला. ट्रस्टकडे आपला अर्ज आणि बायोडाटा सादर केल्यानंतर, अमिताभ ठाकूर यांनी नमूद केले की, श्री राम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदासाठी ते स्वतःला प्रथमदर्शनी पात्र मानतात. ट्रस्टने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीत नमूद केलेली सर्व आवश्यक पात्रता ते पूर्ण करतात. त्यामुळे, त्यांनी CEO पदासाठी आपला अर्ज सादर केला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कला, वारसा आणि आधुनिक सुविधांचा काळा घोडा परिसरात संगम - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, काळा घोडा आर्ट एवेन्यू सुशोभीकरण कामांचे लोकार्पण

संबंधित बातम्या