खंडाळ्यातील एका कंपनी प्रशासनास खंडणी मागणार्‍या चारजणांवर गुन्हा; एकजण ताब्यात

by Team Satara Today | published on : 14 July 2026


सातारा : खंडाळा पोलीस ठाणे हद्दीतील एका कंपनी प्रशासनास बेकायदेशीर माथाडी काम, स्क्रॅप कॉन्ट्रॅक्ट मागणार्‍या चारजणांवर खंडणी अंतर्गत खंडाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रसाद जगताप (रा. शिवाजीनगर) असे अटक करण्यात आलेल्या संशयिताचे नाव असून वैभव कदम, शुभम लाड, अमोल बोडरे यांचा शोध सुरु आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 13 रोजी दुपारी 12.31 वाजण्याच्या सुमारास शिवाजीनगर, ता. खंडाळा येथील मेटाफोल्ड इंजिनिअरिंग प्रायव्हेट लिमिटेड  कंपनीचे डेव्हलप करण्याचे काम चालू आहे.

फिर्यादी हे कंपनीच्या मेन गेटजवळ पाणी पिण्यासाठी बसलेले असताना काळ्या रंगाच्या स्विफ्ट नं एमएच 11 डीयू 1921 या गाडीमधून चारजण आले व ज्या ठिकाणी कंपनीचे डेव्हलपिंगचे काम चालू आहे त्या ठिकाणी जाऊन क्रेन, तसेच डंपर, जेसीबीचे काम बंद करा नाहीतर आम्ही तोडफोड करु, अशी धमकी दिली. त्यावेळी फिर्यादी यांनी तुम्ही काम का बंद करत आहात, असे विचारले असता संबंधित लोक म्हणाले की, आम्हांला कंपनी मध्ये लागणारे सर्व बांधकाम, माथाडी कामगार, स्क्रॅप कॉन्ट्रॅक्ट पाहिजे.

त्यावेळी फिर्यादी यांनी संबंधित बाब ही कंपनी प्रशासनाशी निगडीत आहे. ती आमच्याशी निगडीत नाही. त्यामुळे तुम्हांला काही सांगू शकत नाही, असे सांगितले. त्यावेळी एका आरोपीने फिर्यादीच्या कानाखाली मारली व तेथेच पडलेली लोखंडी सळई घेऊन फिर्यादींच्या पाठीत मारली. तसेच तेथेच पडलेला दगड उचलून फिर्यादी यांच्या दिशेने मारला. पण तो फिर्यादीने चुकविला.

त्यानंतर संबंधित चारजण निघून गेले. फिर्यादी रामदास बबन भोसले (वय 63, व्यवसाय खाजगी नोकरी, रा. शिवाजीनगर, ता. खंडाळा) यांनी दिलेल्या तक्रारीवरून खंडाळा पोलीस ठाण्यात संबंधितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष मस्के करीत आहेत.  

गुन्ह्यातील एका आरोपीस ताब्यात घेण्यात आलेले असून उर्वरित आरोपींचा शोध सुरू आहे. खंडाळा पोलीस स्टेशन हद्दीत अशा प्रकारे कंपनी मालकांना बेकायदेशीररित्या कोणी त्रास देत असल्यास पोलीसांना माहिती देण्याचे आवाहन फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी धन्यकुमार गोडसे तसेच खंडाळा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेंद्र जगताप स्टेशन यांनी नागरिकांना केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पिंपोडे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एसटी बस सुरू ; रिपाइंचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाघांबरे यांचा पाठपुरावा : पालक विद्यार्थ्यांमध्ये समाधान
पुढील बातमी
तोतया पोलिसांच्या टोळीचा पुसेगाव पोलिसांकडून पर्दाफाश; सात जण अटकेत, 21.19 लाखांचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या