पिंपोडे बुद्रुक : रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आंबेडकर) चे जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाघांबरे यांच्या मागणीची दखल घेत कोरेगाव आगाराने पिंपोडे परिसरातील विद्यार्थ्यांसाठी एसटी फेरी सुरू केल्याने पालक व विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
या एसटी फेरीचा शुभारंभ सरपंच सागर लेंभे, उपसरपंच रणजित लेंभे यशवंतराव चव्हाण विद्यालयातील सर्व शिक्षक व मुख्याध्यापक, पालकांच्या उपस्थितीत करण्यात आला. यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल वाघांबरे यांनी एसटी फेरी सुरू होण्यासाठी केलेल्या पाठपुराव्याबद्दल त्यांचा सत्कार करण्यात आला.
पिंपोडे बुद्रुक येथील यशवंतराव चव्हाण विद्यालयात परिसरातील विविध गावांमधून विद्यार्थी विद्यार्थिनी येतात. मात्र सायंकाळी शाळा सुटल्यानंतर त्यांच्यासाठी एसटी बस फेरी नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत होती. याबाबत अनेकदा विनंती करूनही दखल न घेतल्याने राहुल वाघांबरे यांनी कोरेगाव आगाराच्या व्यवस्थापकांना निवेदन देऊन एसटी फेरी तातडीने सुरू करण्याची मागणी केली होती व न केल्यास आंदोलनाचा इशारा दिला होता.
त्याची तातडीने दखल घेऊन कोरेगाव आगाराने विद्यार्थ्यांसाठी सायंकाळच्या वेळी एसटी फेरी सुरू केली आहे. त्याचा शुभारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत झाला यावेळी पालक, विद्यार्थी, ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले.