फलटण : श्री संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळ्याचे शुक्रवार, दि. १७ जुलै रोजी फलटण मुक्कामी आगमन होणार आहे. त्यानिमित्त नगरपरिषद प्रशासनाने स्वागताची जय्यत तयारी हाती घेतली आहे. प्रारंभीच्या टप्प्यातील बहुतांश कामे पूर्ण होत आली असून उर्वरित कामे अंतिम टप्प्यात आहेत. पालखी आगमनापूर्वी सर्व तयारी पूर्णत्वास नेली जाईल, अशी माहिती नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी दिली.
पालखी मार्गावरील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण
पालखी मार्गावरील रस्त्यांची दुरुस्ती, सिमेंट काँक्रीटीकरण, सुशोभीकरण, विद्युत रोषणाई, स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, आरोग्य सुविधा, वाहतूक नियोजन तसेच पालखी तळावरील आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी नगरपरिषद, विविध शासकीय विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या समन्वयातून युद्धपातळीवर काम सुरू आहे. फलटण शहरातील पालखी मार्गावरील फुले चौक, सफाई कामगार कॉलनी, शिवाजी नाका, पालखी प्रवेशद्वार, जिंती नाका नाका तसेच पालखी मार्गावरील प्रमुख चौकांचे सुशोभीकरण करण्यात आले आहे. आकर्षक विद्युत दिवे, रंगरंगोटी, स्वच्छता आणि सौंदर्यीकरणामुळे संपूर्ण मार्गाला उत्सवी स्वरूप प्राप्त झाले आहे.
पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात आली
पालखी मार्गावरील अतिक्रमणे हटवण्यात आली असून रस्ते अधिक प्रशस्त करण्यात आले आहेत. वारकऱ्यांना कोणताही अडथळा निर्माण होऊ नये, यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आहेत. संपूर्ण पालखी मार्गावर विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात येत असून पुरेसा प्रकाश, महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहे, पिण्याच्या पाण्याची सुविधा, कचरा संकलन व निर्जंतुकीकरणाची व्यवस्था करण्यात येत आहे. आवश्यक त्या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जाणार आहे. पालखी तळ परिसरात आरोग्य पथके, रुग्णवाहिका आणि आवश्यक वैद्यकीय सेवा उपलब्ध राहणार आहेत. विमानतळ परिसरातील पालखी तळावर वारकऱ्यांच्या मुक्कामासाठी आवश्यक सुविधा उभारण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. मंडप, पिण्याचे पाणी, जलनिस्सारण व्यवस्था, वीजपुरवठा, सुरक्षा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांची उभारणी वेगाने सुरू आहे.
प्रमुख चौकांमध्ये बंदोबस्त, पार्किंग व्यवस्था
महावितरणच्या माध्यमातून पालखी मार्ग व पालखी तळ परिसरात अखंडित वीजपुरवठा राहावा यासाठी स्वतंत्र वीजजाळे, आवश्यक तेथे डीपी, केबल, स्ट्रीटलाईट दुरुस्ती तसेच जनरेटरची व्यवस्था करण्यात येत आहे. कोणत्याही तांत्रिक अडचणीवर तत्काळ उपाययोजना करण्यासाठी विशेष पथके तैनात राहणार आहेत. पालखी सोहळ्यादरम्यान शहरातील वाहतूक सुरळीत राहावी यासाठी वाहतूक नियंत्रणाचा स्वतंत्र आराखडा तयार करण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाच्या समन्वयातून प्रमुख चौकांमध्ये बंदोबस्त, पार्किंग व्यवस्था आणि वारकऱ्यांच्या सुरक्षित हालचालींसाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.
दरम्यान पालखी मुक्कामाच्या ठिकाणी हजारो वारकरी बांधवांना एकाच ठिकाणी निवारा उपलब्ध व्हावा यासाठी मोठ्या टेंटची उभारणी यशवंतराव चव्हाण हायस्कूलच्या भव्य प्रांगणात केली गेली आहे. त्यामुळे पाऊस आला तरी वारकऱ्यांना निवारा उपलब्ध होणार आहे. वारकऱ्यांना कोणत्याही प्रकारच्या सोयीसुविधांची कमतरता भासू नये यासाठी शासनाचे सर्वच विभाग एकत्रितपणे प्रभावीपणे कार्यरत आहेत.
नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांनी नागरिकांना स्वच्छता राखणे, प्रशासनाला सहकार्य करणे आणि पालखी सोहळा यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन केले आहे. पालखी आगमनापूर्वी सर्व कामे पूर्ण करून संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचे आणि लाखो वारकऱ्यांचे स्वागत फलटणकरांच्या परंपरेला साजेशा उत्साहात करण्यात येणार आहे.
पालखी मार्गावर आधुनिक प्रकाश व्यवस्था
फलटण शहरातील पालखी मार्गाचे अद्ययावतीकरण वेगाने सुरू असून, पूर्ण झालेल्या सिमेंट रस्त्यांवर राजेशाही शैलीतील आधुनिक स्ट्रीट लाईट पोल उभारण्यात येत आहेत. पिरॅमिड चौक, गिरवी नाका, -कामगार कॉलनी, महात्मा फुले चौक, मालोजीराजे पुतळा, रेस्ट हाऊस मार्गावरील आकर्षक प्रकाश व्यवस्था नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे. संपूर्ण पालखी मार्गावर अशाच पद्धतीची प्रकाश व्यवस्था, चौकांचे सुशोभीकरण आणि भूमिगत वीजवाहिन्यांचे काम करण्यात येणार असून त्यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्याबरोबरच विद्युत तारांमुळे होणाऱ्या अपघातांनाही आळा बसेल. लवकरच संपूर्ण शहर आधुनिक स्ट्रीट लाईट व्यवस्थेने सुसज्ज होईल, असा विश्वास नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केला.