सुधारककार गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार डॉ. शरद गोरे यांना प्रदान; इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनच्या सोहळ्यात पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचाही गौरव

by Team Satara Today | published on : 14 July 2026


कराड :  थोर समाजसुधारक, शिक्षणतज्ज्ञ आणि विचारवंत गोपाळ गणेश आगरकर यांच्या 170 व्या जयंतीनिमित्त प्रदान करण्यात येणारा प्रतिष्ठेचा 'गोपाळ गणेश आगरकर राज्यस्तरीय पुरस्कार' यंदा अखिल भारतीय मराठी साहित्य परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष, ज्येष्ठ साहित्यिक डॉ. शरद गोरे यांना प्रदान करण्यात आला. कराड येथे इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनच्या वतीने आयोजित भव्य सोहळ्यात हा सन्मान करण्यात आला.

मराठी साहित्य, संस्कृती आणि सामाजिक क्षेत्रातील दीर्घकालीन व उल्लेखनीय योगदानाची दखल घेत डॉ. गोरे यांना हा मानाचा पुरस्कार देण्यात आला. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी साहित्य चळवळ व्यापक करण्यासाठी सातत्याने काम केले असून, त्यांच्या नेतृत्वाखाली आजवर 196 मराठी साहित्य संमेलनांचे यशस्वी आयोजन करण्यात आले आहे. इतक्या मोठ्या संख्येने साहित्य संमेलने आयोजित करणारे ते देशातील एकमेव साहित्यिक मानले जातात. त्यांच्या या विक्रमी कार्याची नोंद American Book of World Records मध्येही करण्यात आली आहे.

डॉ. गोरे यांनी आजवर दहा ग्रंथांचे लेखन केले आहे. तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी संस्कृतमध्ये रचलेल्या 'बुधभूषण' या ऐतिहासिक ग्रंथाचा मराठी काव्यरूप अनुवादही त्यांनी केला आहे. साहित्याबरोबरच चित्रपट क्षेत्रातही त्यांनी लेखक, दिग्दर्शक, अभिनेते आणि संगीतकार अशा विविध भूमिका यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. त्यांनी तयार केलेल्या 'सूर्या – एक प्रेरणादायी प्रवास' या मराठी चित्रपटाला कान्स आणि बर्लिन या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गौरव मिळाला आहे. याशिवाय, त्यांच्या युगंधर प्रकाशन संस्थेने आजपर्यंत 155 दर्जेदार पुस्तकांचे प्रकाशन केले आहे. प्रभावी वक्ते म्हणूनही त्यांची ओळख असून त्यांनी विविध विषयांवर दोन हजारांहून अधिक व्याख्याने दिली आहेत.

या पुरस्कार सोहळ्याला ज्येष्ठ पत्रकार आणि राजकीय विश्लेषक विजय चोरमारे, रयत सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष उदयसिंह पाटील उंडाळकर, सद्गुरू गाडगे महाराज महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. चंद्रकांत खिलारे यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.

पत्रकारिता क्षेत्रातील मान्यवरांचाही गौरव

या कार्यक्रमात पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या मान्यवरांनाही 'गोपाळ गणेश आगरकर पत्रकारिता राज्यस्तरीय पुरस्कार' देऊन सन्मानित करण्यात आले. पुरस्कार प्राप्त मान्यवरांमध्ये शशिकांत पाटील (संपादक, दैनिक प्रीतिसंगम), विजय जाधव (दैनिक तरुण भारत), प्रविण सरवदे (ज्ञान व माहिती संकलक) आणि अनुराधा कदम (दैनिक पुढारी, कोल्हापूर) यांचा समावेश होता.

आगरकरांच्या जन्मभूमीत झाला गौरव सोहळा

सामाजिक समता, विज्ञाननिष्ठ विचार आणि बुद्धीप्रामाण्यवादाचा पुरस्कार करणारे गोपाळ गणेश आगरकर यांची जन्मभूमी असलेल्या कराड तालुक्यातील टेंभू येथे हा पुरस्कार सोहळा पार पडला. आगरकरांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या या ऐतिहासिक भूमीत डॉ. शरद गोरे यांचा झालेला गौरव हा मराठी साहित्यविश्वासाठी अभिमानाचा क्षण ठरला.

या सोहळ्याचे आयोजन इंद्रधनू विचारमंच फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले होते. संस्थेचे विश्वस्त विकास भोसले, नितीन ढापरे, संदीप चेणगे, प्रमोद तोडकर, अशोक मोहन आणि माणिक डोंगरे यांनी कार्यक्रमाचे नियोजन केले. या सोहळ्यास साहित्यप्रेमी, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि विविध क्षेत्रांतील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वारकऱ्यांच्या सेवेसाठी साताऱ्यात चरणसेवा पथके सज्ज; एक हजाराहून अधिक स्वयंसेवकांचा सहभाग
पुढील बातमी
फलटणमध्ये पालखी सोहळ्याच्या स्वागताची जय्यत तयारी; नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक-निंबाळकर व मुख्याधिकारी निखिल जाधव यांची माहिती

संबंधित बातम्या