फलटण तालुक्यातील होळमध्ये बनावट दूध रॅकेटवर धाड; जप्त साहित्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

by Team Satara Today | published on : 13 July 2026


फलटण : फलटण तालुक्यातील होळ येथे दूध भेसळीच्या संशयावरून अन्न व औषध प्रशासनाने रविवारी सकाळी धडक कारवाई केली. जनावरांच्या एका गोठ्यावर छापा टाकला. या कारवाईत बनावट दूध तयार करण्यासाठी वापरले जात असल्याचा संशय असलेले साहित्य आणि मिक्सर जप्त करण्यात आला.

जप्त साहित्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, अहवालानंतर संबंधितांवर अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत कारवाई करण्यात येणार आहे. याप्रकरणी कुणाल दिलीप भोसले, मंगल दिलीप भोसले, दिलीप भीमराव भोसले (तिघे रा. होळ, ता. फलटण) व पावडर पुरवणारे अन्य दोघा अनोळखी यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया फलटण पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत सुरू होती.

सहआयुक्त तुषार शिंगाडे यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती रूपाली खापणे, इम्रान हवालदार आणि ऋतुजा चव्हाण यांच्या पथकाने रविवारी सकाळी सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई केली. छाप्यादरम्यान जनावरांच्या गोठ्यातून सुमारे ४ किलो औद्योगिक वापरासाठीची व्हे पावडर (एसएनएफ वाढवण्यासाठी वापरली जाणारी), ३ किलो नॉन-डेअरी क्रीम पावडर तसेच हे साहित्य एकत्रित करण्यासाठी वापरला जाणारा मिक्सर जप्त करण्यात आला.

या कारवाईस फलटण ग्रामीण पोलिसांचेही सहकार्य लाभले. महिला पोलिस उपनिरीक्षक ज्योती चव्हाण, पोलिस हवालदार महादेव पिसे, अमोल पवार, पोलिस कॉन्स्टेबल सूरज काकडे, श्रीकांत खरात, कल्पेश काशीद व महिला कॉन्स्टेबल अश्विनी साळुंखे यांनी बंदोबस्त ठेवला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
माऊलींच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात; तरडगाव पालखी तळावर सज्जता : वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा
पुढील बातमी
विविध जिल्ह्यांतील 15 महसूल अधिकाऱ्यांचे निलंबन; नियमबाह्य निर्णय घेणाऱ्यांना बावनकुळेंचा दणका

संबंधित बातम्या