माऊलींच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात; तरडगाव पालखी तळावर सज्जता : वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा

by Team Satara Today | published on : 13 July 2026


तरडगाव : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा गुरुवार दि. १६ जुलै रोजी फलटण तालुक्यातील तरडगाव मुक्कामी येत असून पालखी सोहळ्यासाठी लाखो वैष्णवभक्त दाखल होणार आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाच्यावतीने आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून उर्वरित कामे देखील अंतिम टप्प्यात आली आहेत.

पालखी सोहळ्यासाठी पालखी तळावर दर्शनासाठी महिला व पुरुषांसाठी स्वतंत्र २०० फूट बॅरीगेट लावण्यात आले आहे. विजेच्या दिव्यांसह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. पालखी मुक्कामाच्या ठिकाणी मैदानावर मुरूम टाकून रोलिंग करून घेण्यात आले आहे. पालखी तळावरील झाडे-झुडपे काढून सपाटीकरण करून परिसर पूर्ण स्वच्छ करण्यात आला आहे. दरवर्षी सोहळ्यातील दिंड्या वास्तव्य करत असलेल्या विविध ठिकाणी वाढलेल्या काटेरी झुडपांची विल्हेवाट लावली जात आहे.

महिला व पुरुषांसाठी अंघोळीकरता स्वतंत्र स्नानगृहची सोय 

पालखीतळावर दिंड्यांना चालण्यासाठी व वाहनांसाठी डांबरी रस्ते तयार करण्यात येत आहेत. पालखी तळालगतच महिला व पुरुषांसाठी अंघोळीकरता स्वतंत्र स्नानगृहची सोय करण्यात आली आहे. परिसरात १८०० निर्मलवारी शौचालये विविध ठिकाणी उभी करण्यात आली आहेत. तरडगाव परिसरामध्ये वारकऱ्यांसाठी वैद्यकीय सुविधांची सोय करण्यात आली आहे. वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या पथक करून विविध ठिकाणी दवाखाने उभारण्यात येणार आहेत. पालखी मार्गावरील सर्व विहिरीच्या पाण्याची तपासणी करून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे.

पालखी मार्गातील सर्व रस्त्यांची साफसफाई

पालखी मार्गातील सर्व रस्त्यांची साफसफाई करून घेण्यात आली आहे. पालखीला अडथळा निर्माण करणाऱ्या झाडांच्या फांद्या छाटून टाकण्यात आल्या आहेत. सोहळा काळात पाणीपुरवठ्याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. विविध अठरा ठिकाणी पाण्याचे टँकर भरण्याची सोय करण्यात आली आहे.

तरडगावकरांची उत्सुकता शिगेला

पालखी सोहळ्यासाठी वीज, आरोग्य, पाणी, रस्ते व वाहतुकीच्या सर्व सोयी सविधांची ग्रामपंचायतीच्यावतीने पूर्ण तयारी झाली असून सोहळा सुरळीतपणे पार पडण्याची जबाबदारी यशस्वीरीत्या पार पाडू, असे ग्रामसेवक संदिप कळसाईत यांनी सांगितले. पालखी तळावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून पालखी सोहळ्याच्या स्वागताची प्रशासनाबरोबर तरडगावकरांची उत्सुकता शिगेला पोहचली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
उंब्रजसह परिसरातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा शेतीची लगबग वाढली; खरीप पेरणीच्या कामांना वेग
पुढील बातमी
फलटण तालुक्यातील होळमध्ये बनावट दूध रॅकेटवर धाड; जप्त साहित्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत

संबंधित बातम्या