उंब्रजसह परिसरातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा शेतीची लगबग वाढली; खरीप पेरणीच्या कामांना वेग

by Team Satara Today | published on : 13 July 2026


उंब्रज : ढगफुटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शेत जमिनींमध्ये पुरेसा ओलावा निर्माण झाल्याने लांबणीवर पडलेली खरीप हंगामातील पेरणीची कामे आता वेगाने सुरू झाली आहेत. हवामान खात्याने पुन्हा पुढील आठवड्यात पावसाचा अंदाज वर्तवला असल्याने लांबणीवर पडलेली पेरणीची कामे लगबगीने उरकून घेतली जात आहेत.

सध्या शिवारात भुईमूग, सोयाबीनची पेरणी पूर्ण करण्यासाठी शेतकरी बैलजोडी तसेच ट्रॅक्टरचा वापर करताना दिसत आहे. यावर्षी संपूर्ण जून महिना कोरडा गेला. परिणामी समाधानकारक पाऊस न झाल्याने खरीप हंगामातील पेरणी रखडली होती. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र, गत आठवड्यात झालेल्या जोरदार पावसाने शेतीला नवसंजीवनी मिळाली आहे. अनेक ठिकाणी शेतांमध्ये पाणी साचल्याने जमिनीत आवश्यक ओलावा निर्माण झाला असून पेरणीसाठी अनुकूल परिस्थिती तयार झाली आहे.

उंब्रजसह परिसरातील पाल, इंदोली, पेरले, चरेगाव, भोळेवाडी, शिवडे आदी भागांमध्ये शेतकरी सकाळपासून सायंकाळपर्यंत शेतात पेरणीची कामे करीत आहेत. काही ठिकाणी बैलांच्या सहाय्याने पारंपरिक पद्धतीने पेरणी केली जात आहे.

तर बहुतांश शेतकरी ट्रॅक्टरच्या आधुनिक यंत्रणेद्वारे कमी वेळात अधिक क्षेत्राची पेरणी पूर्ण करण्यावर भर देत आहेत. सोयाबीन, भात, मका, बाजरी, तूर, मूग, उडीद यासारख्या खरीप पिकांच्या पेरणीला वेग आला असून, आगामी काही दिवसांत मान्सूनचा नियमित पाऊस सुरू झाल्यास पिकांच्या उगवणीस मोठी मदत होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असून यंदाचा खरीप हंगाम समाधानकारक ठरेल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गोंदवले हद्दीतील नाळवा मळा येथे सशस्त्र दरोडा; ज्येष्ठ दाम्पत्याला धमकावून पाच तोळे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास
पुढील बातमी
माऊलींच्या स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात; तरडगाव पालखी तळावर सज्जता : वारकऱ्यांसाठी सोयीसुविधा

संबंधित बातम्या