गोंदवले हद्दीतील नाळवा मळा येथे सशस्त्र दरोडा; ज्येष्ठ दाम्पत्याला धमकावून पाच तोळे सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम लंपास

by Team Satara Today | published on : 13 July 2026


म्हसवड : माण तालुक्यातील गोंदवले हद्दीतील नाळवा मळा येथे गुरुवारी मध्यरात्री सशस्त्र दरोडेखोरांनी धाडसी दरोडा टाकत परिसरात खळबळ उडवून दिली. तलवार, चाकू आणि काठ्यांचा धाक दाखवत घरातील ज्येष्ठ दाम्पत्याला धमकावून चोरट्यांनी सुमारे पाच तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने आणि रोख रक्कम असा ऐवज लंपास केला.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी मध्यरात्री सुमारे १२ वाजण्याच्या सुमारास ८ ते १० अज्ञात दरोडेखोरांनी नारायण बिरा चोपडे यांच्या घरावर धाड टाकली. नारायण चोपडे व गंगूबाई चोपडे हे घराच्या दारात झोपलेले असताना दरोडेखोरांनी त्यांना तलवार, चाकू व काठ्यांचा धाक दाखवत धमकावले. त्यानंतर कपाट आणि पेटीच्या चाव्या जबरदस्तीने ताब्यात घेतल्या.

यावेळी चार ते पाच दरोडेखोर घरात शिरून कपाटातील अंदाजे पाच तोळे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, गंगूबाई चोपडे यांच्या अंगावरील सोन्याचे दागिने तसेच सुमारे १५ हजार रुपयांची रोख रक्कम लंपास करून पसार झाले. उर्वरित दरोडेखोर बाहेर पहारा देत उभे होते. घटनेची माहिती मिळताच म्हसवड पोलिस ठाण्याचे सपोनि संदीप पोमण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस पथक तातडीने घटनास्थळी दाखल झाले.

सातारा येथील श्वानपथक, फिंगरप्रिंट तज्ज्ञ आणि अन्य तपास पथकांनी घटनास्थळी सखोल पाहणी करून पुरावे संकलित केले. दरोडेखोरांचा माग काढण्यासाठी पोलिसांनी विविध दिशांनी तपास सुरू केला असून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे व इतर बाबींची पडताळणी केली जात आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
का? तर ते माझ्या जातीचे नव्हते
पुढील बातमी
उंब्रजसह परिसरातील ग्रामीण भागात पुन्हा एकदा शेतीची लगबग वाढली; खरीप पेरणीच्या कामांना वेग

संबंधित बातम्या