पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांची पालखी शनिवारी (दि. ११) सकाळी सहाच्या सुमारास पंढरीच्या दिशेने मार्गस्थ झाली. प्रस्थानापूर्वी, साडेपाच वाजता पालखी सोहळा अध्यक्ष ॲड. राजेंद्र उमाप यांच्या हस्ते अभिषेक आणि महापूजा पार पडली. त्यानंतर, पालखीने सोलापूर मार्गाने हडपसरच्या दिशने प्रस्थान ठेवले. या वेळी पालख्यांसमवेत पंढरीकडे निघालेल्या लाखो वैष्णवांना पुणेकर भाविकांनी निरोप दिला.
भवानी पेठ येथील पालखी विठ्ठल मंदिरात विसावलेल्या माऊलींच्या चल पादुकांच्या दर्शनासाठी पहाटेच्या महापूजेपर्यंत भाविक रांगा लावून दर्शन घेत होते. अभिषेक आणि महापूजा पार पडल्यानंतर माउलींची पालखी हडपसरमार्गे सासवडच्या दिशेने रवाना झाली. दोन दिवसांच्या विश्रांतीमुळे सोहळ्यात कमालीचा उत्साह होता. दोन दिवस वैष्णवांची सेवा केलेल्या पुणेकरांनी निरोप देण्यासाठी रस्त्याच्या दुतर्फा गर्दी केली होती. त्यातून वाट काढत सोहळा भक्तीच्या ओथंबत्या वातावरणात मार्गक्रमण करीत होता.
शिंदे छत्री येथे आल्यानंतर माउलींच्या चलपादुकांची आरती करण्यात आली. सकाळी दहाच्या सुमारास संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी गाडीतळ येथील मुख्य बस थांब्याच्या प्रांगण असलेल्या विसावा स्थळी आली. पालखी आगमनाच्या पार्श्वभूमीवर या ठिकाणी रांगोळ्यांच्या आकर्षक पायघड्या टाकण्यात आल्या होत्या. शहरासह वाघोली, मांजरी खुर्द-ब्रुद्रुक, आव्हाळवाडी, चंदननगर, खराडी, मुंढवा, केशवनगर, कोंढवा, उंड्री आदी भागांतील नागरिक विसावास्थळी दर्शनासाठी एकत्र आले होते.
विसाव्यानंतर पालखी सकाळी अकराच्या सुमारास सासवड रस्त्याने मार्गस्थ झाली. मार्गावरील ग्रामस्थांनी ठिकठिकाणी पालखीचे उत्स्फूर्त स्वागत केले. मात्र, पालखी मार्गाच्या रुंदीकरणाची कामे सुरू असल्याने सोहळ्याला काहीसा विलंब झाला. हडपसरनंतर भेकराईनगर येथे फुरसुंगी ग्रामस्थांनी माउलींच्या पालखीचे जल्लोषात स्वागत केले. दुपारी सुमारे दीडच्या सुमारास पालखी उरुळी देवाची फाट्यावर दाखल झाली.
उरुळी देवाची पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी पालखीचे पारंपरिक पद्धतीने स्वागत केले. उरुळी देवाची येथील विसाव्यादरम्यान अनेक वारकऱ्यांनी न्याहारीचा आस्वाद घेतला. त्यानंतर पालखी वडकीकडे रवाना झाली. वडकी येथे विसावा घेतल्यानंतर सायंकाळी साडेपाचच्या सुमारास मानाच्या सहा बैलजोडीसह माउलींच्या पालखी रथाने दिवेघाट चढण्यास सुरुवात केली. त्यानंतर, रात्री उशिरा सासवड येथे एका दिवसाच्या मुक्कामी पोहोचली.