सातारा जिल्हा बँकेच्या निवडणुकासाठी मोर्चे बांधणीला सुरुवात; महायुती-महाविकास आघाडीत थेट सामना रंगण्याची शक्यता

by Team Satara Today | published on : 12 July 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या २०२६-३१ कालावधीतील संचालक मंडळाच्या निवडणुकीची प्रक्रिया सुरू होताच जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापू लागले आहे. राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाने निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केल्यानंतर आता महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही प्रमुख राजकीय आघाड्यांनी मोर्चेबांधणीला वेग दिला असून, जिल्हा बँकेची ही निवडणूक आगामी स्थानिक स्वराज्य संस्था आणि विधानसभा निवडणुकांची रंगीत तालीम ठरणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

जिल्हा सहकार निवडणूक अधिकारी तथा विभागीय सहायक निबंधक डॉ. महेश कदम यांनी जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार ७ जुलै ते ५ ऑगस्ट या कालावधीत सभासद संस्थांच्या प्रतिनिधींचे ठराव स्वीकारले जाणार आहेत. या प्रक्रियेनंतर मतदारसंघनिहाय राजकीय चित्र अधिक स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.

महायुतीतील घटक पक्षांकडून तालुकानिहाय बैठका, सभासद संस्थांशी संपर्क, संभाव्य उमेदवारांची चाचपणी आणि स्थानिक पातळीवरील समन्वय सुरू झाला आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीतील पक्षही आपले पारंपरिक बालेकिल्ले कायम राखण्यासाठी आणि एकसंघ रणनीती आखण्यासाठी हालचाली करत आहेत. त्यामुळे उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच राजकीय घडामोडींना वेग आला आहे.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेवरील वर्चस्व हे केवळ सहकार क्षेत्रापुरते मर्यादित नसून जिल्ह्यातील राजकीय नेतृत्व, ग्रामीण भागातील प्रभाव आणि आगामी निवडणुकांतील ताकद यांच्याशीही जोडलेले मानले जाते. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वच प्रमुख पक्षांनी प्रतिष्ठेच्या लढतीच्या दृष्टीने पाहण्यास सुरुवात केली आहे.

ठराव प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उमेदवारी, आघाड्या, स्थानिक समीकरणे आणि राजकीय रणनीती अधिक स्पष्ट होणार असून, सातारा जिल्ह्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा थेट सामना रंगण्याची शक्यता राजकीय जाणकार व्यक्त करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जागतिक लोकसंख्या दिन: धनंजयराव गाडगीळ महाविद्यालयात व्याख्यान संपन्न; देशाची खरी संपत्ती कार्यक्षम लोकसंख्या : प्राचार्य डॉ. अरुण आंधळे
पुढील बातमी
शेतकऱ्यांना जुलै महिना संपण्यापूर्वीच कर्जमाफी देण्यास सरकार कटिबद्ध - कृषीमंत्री दत्तात्रय भरणे; आयकरदात्या शेतकऱ्यांना योजनेतून वगळणार

संबंधित बातम्या