कराडसह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा; आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत किरपे गावच्या प्राची देवकर पटकावले कांस्यपदक

by Team Satara Today | published on : 12 July 2026


कराड : चीन येथे झालेल्या आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेत कराड तालुक्यातील किरपे गावची कन्या कुमारी प्राची अंकुश देवकर हिने ३००० मीटर ट्रिपल चेस प्रकारात १० मिनिटे ३२ सेकंदांची वेळ नोंदवत भारतासाठी कांस्यपदक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे कराडसह सातारा जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला असून सर्व स्तरांतून तिच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

प्राची देवकर ही कराडमधील हिरकणी सामाजिक क्रीडा संस्थेचे प्रशिक्षक तथा आंतरराष्ट्रीय खेळाडू अतुल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अकरा वर्षांपासून सातत्याने सराव करत आहे. तिच्या कठोर परिश्रम, चिकाटी आणि प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनामुळे राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर तिने सातत्याने यश मिळविले आहे.

यापूर्वी प्राचीने राष्ट्रीय स्पर्धांमध्ये सात ते आठ पदकांची कमाई केली असून त्यामध्ये सुवर्ण, रौप्य आणि कांस्यपदकांचा समावेश आहे. तसेच भारताचे प्रतिनिधित्व करताना चीनमध्ये झालेल्या जागतिक क्रॉस कंट्री स्पर्धेत आणि दक्षिण आशियाई स्पर्धेतही तिने पदके जिंकून देशाचा गौरव वाढविला होता.

आता आशियाई ॲथलेटिक्स स्पर्धेतील कांस्यपदकाने तिच्या यशात आणखी एक मानाचा अध्याय जोडला आहे. मर्यादित सुविधा असूनही ग्रामीण भागातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करू शकतात, हे प्राचीने आपल्या यशातून सिद्ध करून दाखवले आहे. या यशाबद्दल प्राची देवकर हिच्यासह तिचे प्रशिक्षक अतुल पाटील यांचे हिरकणी सामाजिक क्रीडा संस्थेचे अध्यक्ष सलीमभाई मुजावर, उपाध्यक्ष डॉ. दिलीप पाटील तसेच संस्थेच्या सर्व पदाधिकाऱ्यांसह कराड तालुक्यातील विविध संस्थांच्या पदाधिकाऱ्यांनी, मान्यवरांसह व खेळाडूंनी अभिनंदन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दूध संकलन केंद्रचालकांनी दीड ते दोन हजार लिटर दूध रस्त्याच्या कडेला ओतले; माण तालुक्यातील मोही येथील प्रकार
पुढील बातमी
सातारा जिल्ह्याच्या पश्चिमेकडील बहुतांशी भागात पावसाची उघडीप; पूर्वेकडे आजही प्रतीक्षा, कोयनेत ५१.७१ टीएमसी पाणीसाठा

संबंधित बातम्या