सातारा : जुन्या औद्योगिक वसाहतीतील एका चारचाकी वाहनांच्या शोरूममध्ये टेस्ट ड्राईव्हच्या बहाण्याने आलेल्या अज्ञाताने 16 लाख रुपये किमतीची कार चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञाताविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कारंडवाडी येथील नवनाथ कॉलनीतील रहिवासी स्वप्नील सुरेश बोभाटे हे संबंधित शोरूममध्ये कार्यरत आहेत. रविवारी (ता. 5) सकाळी एक व्यक्ती वाहन खरेदीच्या उद्देशाने शोरूममध्ये आला. त्याने टेस्ट ड्राईव्हची मागणी केली. वाहन चालविताना इंजिनमधून आवाज येत असल्याचे सांगून त्याने बोभाटे यांना खाली उतरवले आणि क्षणात 16 लाख रुपये किंमतीची कार घेऊन पसार झाला.
या घटनेनंतर बोभाटे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस कर्मचारी देखणे करीत आहेत.