सातारा : देशव्यापी मागणी दिनानिमित्त सातारा जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तक यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधले. यावेळी आशा कर्मचाऱ्यांवर सहाय्यक बीएलओची अतिरिक्त जबाबदारी सक्तीने टाकू नये, अशी प्रमुख मागणी निवडणूक उपजिल्हाधिकारी भगवान कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
आशा व गटप्रवर्तक या मोबदल्यावर कार्यरत असल्याने त्यांच्याकडून नियमित कामांव्यतिरिक्त विविध शासकीय जबाबदाऱ्या विनामोबदला करून घेतल्या जात असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. त्यामुळे अशा अतिरिक्त कामांची सक्ती तातडीने थांबवावी, तसेच दर महिन्याचे मानधन १ ते ५ तारखेच्या दरम्यान खात्यात जमा करण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी करण्यात आली.
याशिवाय केंद्र सरकारने मार्च २०२५ मध्ये जाहीर केलेला प्रतिमहिना १,५०० रुपयांचा प्रोत्साहन भत्ता त्वरित अदा करावा, ग्रामपंचायत स्तरावरील कोरोना काळातील थकीत भत्ता सर्व आशा व गटप्रवर्तकांना द्यावा, आशा कर्मचाऱ्यांना किमान २६ हजार रुपये तर गटप्रवर्तकांना ३५ हजार रुपये मासिक वेतन लागू करावे, सेवासमाप्ती लाभ म्हणून दोन लाख रुपयांचे अनुदान मंजूर करावे आणि यापूर्वी विनामोबदला करून घेतलेल्या कामांचा थकीत मोबदला त्वरित अदा करावा, अशा मागण्यांचाही निवेदनात समावेश होता.
या आंदोलनाचे नेतृत्व कॉ. आनंदी अवघडे यांनी केले. आंदोलनात राणी कुंभार, रूपाली पवार, कल्याणी सोमदे, शीला साळुंखे, सुवर्णा पाटील, शैला साळुंखे, मनीषा सपकाळ, वृषाली ढेकणे, मं