महिला रुग्णांशी गैरवर्तनाच्या आरोपांवर जिल्हा परिषदेसमोर थाळीनाद आंदोलन; रयत राज संघटनेची निष्पक्ष चौकशीची मागणी

by Team Satara Today | published on : 10 July 2026


सातारा : महिला रुग्णांशी गैरवर्तन केल्याचा आरोप असलेल्या दोन वैद्यकीय अधिकाऱ्यांविरोधात तातडीने कारवाई करण्याच्या मागणीसाठी रयत राज संघटनेच्या महिला आघाडीने शुक्रवारी जिल्हा परिषद कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर थाळीनाद व लाटणे आंदोलन केले. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेच्या पार्श्वभूमीवर झालेल्या या आंदोलनामुळे परिसरात काही काळ घोषणाबाजीने वातावरण दणाणून गेले.

संघटनेने कनेर (ता. सातारा) येथील वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल कदम आणि कोळे (ता. कराड) येथील डॉ. प्रकाश कदम यांच्याविरोधात महिला रुग्णांशी अयोग्य वर्तन केल्याचा आरोप केला आहे. या प्रकरणी वारंवार लेखी तक्रारी करूनही संबंधितांवर ठोस कारवाई झाली नसल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.

रयत राज संघटनेचे अध्यक्ष तथा माजी जिल्हा परिषद सदस्य संदीप भाऊ शिंदे व महिला आघाडीच्या वनिता जाधव यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन पार पडले. "महिला रुग्णांना न्याय द्या", "दोषींवर कठोर कारवाई करा" अशा घोषणांसह महिलांनी निषेध नोंदवला. डॉक्टरांवरील आरोपांची निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांनी सांगितले की, कोळे येथील प्रकरणाची चौकशी पूर्ण झाली असून कनेर येथील तक्रारींसाठी तीन सदस्यीय चौकशी समिती नियुक्त करण्यात आली आहे. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तो जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत अंतिम निर्णयासाठी राज्य शासनाकडे पाठविण्यात येणार आहे.

डॉक्टरांवर कारवाईचा इशारा

रयत राज संघटनेने महिला रुग्णांशी गैरवर्तनाच्या तक्रारींमध्ये निष्पक्ष चौकशी करून दोषी आढळणाऱ्या संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांवर तातडीने कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. तक्रारी असूनही योग्य ती कार्यवाही न झाल्यास जिल्हाभर तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही संघटनेने प्रशासनाला दिला आहे. तसेच महिला रुग्णांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आरोग्य विभागाने संवेदनशीलतेने निर्णय घ्यावा, अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मतदार पुनरिक्षण फॉर्म भरण्यास दिरंगाई नको - मुख्याधिकारी विनोद जळक, २९ जुलैपर्यंत विशेष मतदार पुनरिक्षण मोहीम
पुढील बातमी
आशा व गटप्रवर्तकांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर धरणे; मानधन, बीएलओ कामाच्या सक्तीविरोधात सरकारचे लक्ष वेधले

संबंधित बातम्या