स्मार्ट मीटरच्या सक्तीविरोधात राष्ट्रवादीचा एल्गार; सातार्‍यात महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा, सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

by Team Satara Today | published on : 10 July 2026


सातारा : स्मार्ट मीटर बसविण्याच्या राज्य शासनाच्या धोरणाविरोधात राष्ट्रवादी कॉंग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाने शुक्रवारी सातार्‍यात आक्रमक भूमिका घेत महावितरणच्या कार्यालयावर जोरदार निदर्शने केली. आमदार शशिकांत शिंदे आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सरकार आणि महावितरणविरोधात तीव्र घोषणाबाजी करत परिसर दणाणून सोडला.

कृष्णा नगरीतील ‘वीज मित्र’ कार्यालयाबाहेर मोठ्या संख्येने जमलेल्या कार्यकर्त्यांनी स्मार्ट मीटर म्हणजे जनतेची फसवणूक, सक्ती चालणार नाही, स्मार्ट मीटर रद्द करा, अशा घोषणा देत शासनाच्या निर्णयाचा निषेध केला. आंदोलनादरम्यान हातात निषेधाचे फलक घेऊन कार्यकर्त्यांनी नागरिकांवर स्मार्ट मीटर लादण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला.

यानंतर राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळाने महावितरणचे अधीक्षक अभियंता यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. स्मार्ट मीटर वापराबाबत नागरिकांमध्ये मोठा संभ्रम असून अनेक ठिकाणी सक्ती केली जात असल्याच्या तक्रारी वाढत आहेत. ही परिस्थिती तातडीने थांबवून स्मार्ट मीटर बसविण्याची मोहीम तत्काळ रद्द करावी, अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली.

आमदार शशिकांत शिंदे यांनी, स्मार्ट मीटरच्या नावाखाली सर्वसामान्य ग्राहकांवर आर्थिक बोजा टाकण्याचा डाव आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. जनतेच्या हिताविरोधातील कोणताही निर्णय राष्ट्रवादी सहन करणार नाही. सरकारने हा निर्णय मागे घेतला नाही तर राज्यभर तीव्र जनआंदोलन उभारले जाईल, असा इशारा दिला.

माजी आमदार बाळासाहेब पाटील यांनीही शासनावर टीका करत, स्मार्ट मीटरची सक्ती करून जनतेची दिशाभूल केली जात आहे. नागरिकांच्या हिताचा विचार न करता घेतलेले निर्णय आम्ही हाणून पाडू. लोकांच्या पैशावर अन्याय करणारे कोणतेही धोरण स्वीकारले जाणार नाही, असे स्पष्ट केले.

आंदोलनामुळे काही काळ महावितरण कार्यालय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलीस बंदोबस्तात आंदोलन शांततेत पार पडले.

राष्ट्रवादी कॉंग्रेसने स्पष्ट इशारा दिला आहे की, नागरिकांवर स्मार्ट मीटर बसविण्याची सक्ती सुरूच राहिली तर यापेक्षा अधिक तीव्र आणि व्यापक आंदोलन छेडण्यात येईल.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राजवाडा पशुवैद्यकीय रुग्णालयाची जागा हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावरून प्रचंड गदारोळ; सत्ताधारी- विरोधकांमध्ये जोरदार संघर्ष
पुढील बातमी
शेतीपंपांच्या तांब्याच्या केबल चोरीप्रकरणी दोघे अटकेत; वाठार पोलिसांची कामगिरी, तीन गुन्ह्यांची उकल

संबंधित बातम्या