छत्रपती संभाजीनगर : भारतातील दहशतवादी भरती आणि देशांतर्गत संवेदनशील माहिती पाकिस्तानला पुरवण्याच्या अनेक गंभीर प्रकरणांमध्ये एका कुख्यात पाकिस्तानी गँगस्टरचे नाव समोर आल्याने भारतीय सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. महाराष्ट्रातील काही तरुण सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट पाकिस्तानातील लाहोर येथील हस्तकांच्या संपर्कात असल्याची धक्कादायक गुप्त माहिती मिळाल्यानंतर, राज्याच्या दहशतवाद विरोधी पथकाने हे आंतरराष्ट्रीय अतिरेकी नेटवर्क मुळासकट उद्ध्वस्त करण्यासाठी गुरुवारी मध्यरात्रीपासून राज्यभरात अभूतपूर्व आणि धडक छापेमारी सुरू केली आहे.
मुंबई ते मराठवाड्यापर्यंत १५० ठिकाणी धाडी
पोलिसांच्या 'स्पेशल सेल'ने बुधवारी शहजाद भट्टीशी संबंधित कथित दोन गट उद्ध्वस्त करून दिल्ली आणि पंजाबमधून सहा संशयित कार्यकर्त्यांना अटक केली होती; त्यानंतर महाराष्ट्रात या धाडी टाकण्यात आल्या आहेत. महाराष्ट्र एटीएसच्या विशेष पथकांनी मुंबई, ठाणे, कुर्ला, वांद्रे, जोगेश्वरी, नवी मुंबई, मीरा रोड, भाईंदर, सांगली, सातारा, बीड, जालना, धाराशिव आणि छत्रपती संभाजीनगरसह संपूर्ण राज्यभरातील १५० हून अधिक संशयास्पद ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून व्यापक शोधमोहीम सुरू केली आहे. या कारवाईचा मुख्य रोख पाकिस्तानातील लाहोरचा मूळ रहिवासी असलेल्या शहजाद भट्टी याच्या डिजिटल नेटवर्कवर आहे. शहजाद भट्टी हा पूर्वी ऑनलाइन कंटेंटच्या माध्यमातून सोशल मीडियावर सक्रिय होता, मात्र आता तो दुबईत बसून गुन्हेगारी टोळ्यांचे आंतरराष्ट्रीय नेटवर्क चालवत असल्याचे उघड झाले आहे. डिजिटल प्लॅटफॉर्म्सचा गैरवापर करून असुरक्षित भारतीय तरुणांना पैशांचे आमिष दाखवून जाळ्यात ओढणे आणि त्यांच्यात कट्टरतावादी विचारसरणी रुजवून त्यांना दहशतवादी कारवायांकडे वळवणे, असा अत्यंत गंभीर आरोप त्याच्यावर आहे.