महाबळेश्वर शहर व तालुक्‍यात पावसाचा जोर ओसरला; जूनपासून आतापर्यंत २,५६०.४ मिमी पावसाची नोंद

by Team Satara Today | published on : 10 July 2026


महाबळेश्‍वर : महाबळेश्वर शहर व तालुक्‍यात सुरू असलेल्या पावसाने गुरुवारी सकाळी शंभर इंचांचा टप्पा पार केला. जूनपासून आतापर्यंत १००.८० इंच (२,५६०.४ मिमी) पावसाची नोंद झाली आहे. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीने जनजीवन विस्कळीत झाले. मात्र, गुरुवारी पावसाचा जोर ओसरला.

हवामान विभागाच्या नोंदीनुसार, १ जून ते ९ जुलैपर्यंत महाबळेश्वरमध्ये एकूण २,५६०.४ मिमी (१००.८० इंच) पावसाची नोंद झाली आहे. तर बुधवारी सकाळी ८.३० ते गुरुवारी सकाळी ८.३० या २४ तासांत १४७.८ मिमी (५.८१ इंच) पाऊस झाला. जुलैच्या पहिल्या सात दिवसांत झालेल्या मुसळधार पावसामुळे नदी, नाले आणि ओढे दुथडी भरून वाहू लागले. तालुक्यात अनेक ठिकाणी दरडी कोसळणे, रस्ते खचणे, झाडे उन्मळून पडणे अशा घटना घडल्या.

तालुक्यातील दुर्गम देवसरे गावाजवळ गुरूवारी डोंगरावर भूस्खलन झाल्याने पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईनचे मोठे नुकसान झाले. मात्र नागरी वस्तीला कोणताही धोका नसल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे.

महाबळेश्वर–तापोळा मुख्य रस्ता भेगाळल्‍याने काही काळ वाहतूक मंदावली होती. गुरूवारी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाहणी करून तातडीने जेसीबीच्या सहाय्याने खडीकरण करत तात्पुरत्या उपाययोजना केल्या असून, सध्या या मार्गावर एकेरी वाहतूक सुरू आहे. महाबळेश्वर पालिकेने विकसित केलेल्या लॉडविक पॉइंटकडे जाणाऱ्या काँक्रीट रस्त्याखालची माती वाहून गेल्याने रस्त्याचा एक भाग खचला आहे. पालिकेकडून तात्पुरत्या दुरुस्तीची कामे हाती घेण्यात आली असून, सुरक्षिततेच्या कारणास्तव वन विभागाने लॉडविक पॉइंट पर्यटकांसाठी बंद ठेवला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
दारूच्‍या नशेत घरात डोकावल्‍याच्‍या कारणातून भिगवणच्‍या पर्यटकाचा खून; मारहाण करणार्‍या संशयितांना अटक
पुढील बातमी
मुसळधार पावसाने टकेवाडी -संवादे येथे रस्त्यात दरड कोसळली

संबंधित बातम्या