सातारा जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरला; २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान वाई तालुक्याच्या जोर येथे ३१५ मिलिमीटर, महाबळेश्वरला २६६ मिलिमीटर

by Team Satara Today | published on : 09 July 2026


सातारा : जिल्ह्याच्या पश्चिम भागातील पावसाचा जोर ओसरला असून, २४ तासांत सर्वाधिक पर्जन्यमान वाई तालुक्याच्या जोर येथे ३१५ मिलिमीटर झाले. यानंतर महाबळेश्वरला २६६ मिलिमीटर पाऊस झाला आहे. त्याचबरोबर कोयना पाणलोट क्षेत्रात पाऊस सुरूच असल्याने धरण ४० टक्के भरले आहे. बुधवारी सकाळच्या सुमारास ४२ टीएमसी साठा झाला होता. तर, साताऱ्यातही पावसाची उघडझाप सुरू असून, जावळी तालुक्यात भूस्खलनाच्या भीतीने ६१ लोकांना स्थलांतरित करण्यात आले आहे.

जिल्ह्यात मागील शुक्रवारपासून पावसाचा जोर वाढला होता. पाटण, जावळी, वाई, सातारा आणि महाबळेश्वर तालुक्यात धुवाधार पाऊस झाला. यामुळे कोयना धरणात मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक झाली. तसेच धोम, बलकवडी, कण्हेर, तारळी आणि उरमोडी या धरण पाणलोट क्षेत्रातही पावसाचा जोर राहिला.

बुधवारी सकाळी आठपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १६५ मिलिमीटर पाऊस झाला. तर, नवजा येथे १६० आणि महाबळेश्वरमध्ये २६६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली. कोयना धरणातही पाण्याची आवक कायम आहे. सकाळच्या सुमारास ७३ हजार क्युसेक वेगाने पाणी येत होते. त्यामुळे धरणात २४ तासांत ६.३१ टीएमसी वाढ झाली. सकाळी धरणात ४२.०१ टीएमसी साठा झाला होता.

१६ कुटुंबे नातेवाइकांकडे वास्तव्यास

जावळी तालुक्यात मुसळधार पाऊस पडत होता. यामुळे अनेक गावांतील लोकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले. म्हाते मुरा येथेही काही भागांत भूस्खलन झाले आहे. त्यामुळे जमिनीला भेगा पडल्या आहेत. पुढील दुर्घटना टाळण्यासाठी १६ कुटुंबांतील ६१ लोकांना नातेवाइकांकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.

महाबळेश्वरला २,१९० मिलिमीटर पाऊस

जिल्ह्यात जून महिन्यापासून मान्सूनचा पाऊस सुरू होतो. आतापर्यंत जिल्ह्यात सर्वाधिक पर्जन्यमान हे महाबळेश्वरमध्ये २ हजार १९० मिलिमीटर झाले आहे. तर, नवजाला १ हजार ७१४ आणि कोयनानगरला १ हजार ४७९ मिलिमीटर पाऊस पडला. तसेच, पाटण तालुक्यातील पाथरपूंज येथेही अधिक पाऊस झाला.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महाबळेश्वर, माथेरानमधील अनधिकृत बांधकामांची चौकशी करणार - मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची घोषणा
पुढील बातमी
पाचगणीजवळ भिंगवणच्या पर्यटकाचा लाकडी दांडक्याने मारहाण करून खून; संशयित चौघे जेरबंद

संबंधित बातम्या