सातारा : शहरातील न्यू विकासनगर, संगमनगर परिसरात बंद असलेल्या घराचे कुलूप फोडून अज्ञात चोरट्याने सोन्याचे दागिने, लॅपटॉप, कॅमेरे, गॅस सिलिंडर आणि रोख रक्कम असा मोठा ऐवज लंपास केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी सातारा शहर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दि. 23 ते 30 जून दरम्यान ही चोरी झाली. घर बंद असल्याची संधी साधून चोरट्याने मुख्य दरवाजाचे कुलूप तोडत घरातील लहान मुलांचे सोन्याचे कानातील दागिने, चार सोन्याच्या अंगठ्या, लिनोव्हा कंपनीचा लॅपटॉप, निकॉन कंपनीचा कॅमेरा, मोठा रोल कॅमेरा, दोन शूटिंग कॅमेरे, एक फोटो कॅमेरा, एचपी कंपनीचा भरलेला गॅस सिलिंडर आणि सहा हजार रुपये रोख रक्कम असा सुमारे 25 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला.
याप्रकरणी संगीता ज्ञानेश्वर शेलार रा. न्यू विकासनगर, संगमनगर, सातारा यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून महिला पोलीस हवालदार कदम पुढील तपास करत आहेत.