सातारा जिल्हा परिषदेची उद्या सर्वसाधारण सभा; विकासकामे, शाळा, इमारती व समाजकल्याणासह 18 विषयांवर होणार चर्चा

by Team Satara Today | published on : 09 July 2026


सातारा : सातारा जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा उद्या दि. 10 रोजी दुपारी 1 वाजता छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात होणार असून, विविध विकासकामे, शिक्षण, बांधकाम, ग्रामपंचायत, समाजकल्याण आणि प्रशासकीय विषयांवरील एकूण 18 मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होणार आहे. तसेच अध्यक्षांच्या परवानगीने ऐनवेळी येणार्‍या विषयांचाही सभेत समावेश होणार आहे.

सभेच्या प्रारंभी मागील सर्वसाधारण सभेचा कार्यवृत्तांत कायम करण्यासह, त्या सभेत मंजूर झालेल्या ठरावांवर झालेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला जाणार आहे. महाराष्ट्र शासनाकडून प्राप्त शासन निर्णय व परिपत्रकांचेही अवलोकन करण्यात येणार आहे.

शिक्षण विभागाच्या विषयांमध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळांतील जीर्ण व धोकादायक खोल्या निर्लेखित करून पाडण्यास कार्योत्तर मान्यता देणे, तसेच खटाव तालुक्यातील विसापूर येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या आठ नवीन वर्गखोल्यांच्या बांधकामासाठी प्राप्त ई-निविदेला मंजुरी देण्याचा प्रस्ताव सभेपुढे ठेवण्यात येणार आहे.

जिल्हा परिषदेची सन 2026-27 ची दैनंदिनी छपाईसाठी एक लाख रुपयांच्या खर्चास मान्यता देण्याबाबतही निर्णय अपेक्षित आहे.

ग्रामपंचायत विभागामार्फत तालुकानिहाय जीर्ण व वापरास अयोग्य ठरलेल्या जुन्या इमारती आणि पाण्याच्या टाक्या निर्लेखित करण्यासंदर्भातील कार्यवाहीचे अवलोकन करून त्यास मान्यता देण्याचा विषयही सभेत चर्चिला जाणार आहे.

बांधकाम विभागाच्या उत्तर व दक्षिण विभागांशी संबंधित विविध प्रस्ताव सभेपुढे असणार आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या प्रशासकीय तसेच निवासी इमारतींच्या देखभाल-दुरुस्तीसाठी सन 2026-27 या आर्थिक वर्षातील निधी वितरण, योजनांतर्गत मंजूर कामांना प्रशासकीय मान्यता तसेच विविध विकासकामांच्या प्रस्तावांवर निर्णय होणार आहे.

समाजकल्याण विभागांतर्गत जिल्हा परिषद स्वनिधीच्या पाच टक्के निधीतून विज्ञान शाखेत शिक्षण घेणार्‍या दिव्यांग विद्यार्थ्यांना आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबत ठराव सभेत मांडण्यात येणार आहे.

याशिवाय भवानी पेठेतील पशुवैद्यकीय चिकित्सालयाची मालमत्ता सातारा नगर परिषदेकडे हस्तांतरित करण्याच्या प्रस्तावावरही चर्चा होणार आहे.

सभेला जिल्हा परिषद अध्यक्ष डॉ. प्रियाताई महेश शिंदे, उपाध्यक्ष राजू भोसले, मुख्य कार्यकारी अधिकारी यशनी नागराजन, विविध विषय समित्यांचे सभापती, सर्व जिल्हा परिषद सदस्य व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत. विविध विकासकामांच्या अनुषंगाने महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता असल्याने या सर्वसाधारण सभेकडे जिल्ह्यातील जनतेचे लक्ष लागले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
स्मार्ट मीटर ‘सक्ती मागे घ्या, अन्यथा जिल्हाभर तीव्र आंदोलनाचा राष्ट्रवादीचा इशारा; शशिकांत शिंदे, बाळासाहेब पाटील यांच्या नेतृत्वाखाली उद्या महावितरण कार्यालयाला घेराव
पुढील बातमी
रस्त्याचे कॉंक्रिटीकरण सुरू असल्याने पोवई नाका-बॉम्बे रेस्टॉरंट चौक मार्गावर अवजड वाहनांना बंदी; 30 सप्टेंबरपर्यंत वाहतुकीत मोठे बदल

संबंधित बातम्या